ठाणे : मुंब्रा येथे घडलेल्या रेल्वे अपघातात चार प्रवाशांनी जीव गमावल्यानंतर संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच शेजारील दिवा रेल्वे स्थानकातील गर्दीचा प्रश्नही चिघळू लागला आहे. दिवा स्थानकात अजूनही दररोज शेकडो प्रवासी नियम मोडून, थेट रुळ ओलांडत धोकादायक पद्धतीने रेल्वेगाड्यांमध्ये चढताना दिसतात. दिवा हे स्थानक अनेक जलद लोकल गाड्यांचे थांबे असले तरी या गाड्यांमध्ये दिव्यातून चढणाऱ्या प्रवाशांना सहसा आत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे या प्रवाशांचा गाडीत आधीपासून असलेल्या प्रवाशांशी वारंवार वाद होतो आहे. ही वादाची स्थिती शिवीगाळ व कधी कधी धक्काबुक्कीपर्यंतही पोहोचत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
विशेष म्हणजे, ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गिकेवरील रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. परंतु ठाणे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची गर्दी, व त्याच दिशेने दिवा स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी एकाच वेळेस समोरासमोर येत असल्याने गोंधळाचे आणि जीवघेण्या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील दिवा हे शहर गेल्या १० ते १५ वर्षांत वेगाने विस्तारत आहे. मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या या शहरात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषतः कोकणातील नागरिकांसाठी दिवा हे शहर मुंबईच्या जवळचे आणि तुलनेत स्वस्त पर्याय असल्यामुळे त्यांच्या निवासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील सर्वात मोठी समस्या म्हणजे अनियंत्रित आणि बेकायदेशीर बांधकामे आहेत. मोठ्या प्रमाणावर कांदळवनांमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चाळी, झोपडपट्ट्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा असलेल्या वसाहती वाढल्या आहेत. स्वस्त दरात घरे मिळत असल्याने अल्प उत्पन्न असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे वास्तव्यास येत आहेत.
दिवा रेल्वे स्थानकातून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांना थांबा मिळतो. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणातील गावांशी जोडलेली अनेक कुटुंबे दिवामध्ये स्थायिक झाली आहेत. मुंबईत नोकरी करताना कोकणात जाण्या-येण्यासाठी दिवा ही मध्यवर्ती आणि सोयीची जागा ठरते. यामुळे दिवा शहर अतिशय बेशिस्त पद्धतीने वाढले आहे. त्याचा परिणाम स्थानकातील प्रवासी वाहतुकीवर देखील होत आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकात घडलेला अपघात ज्या रेल्वे गाडीत झाला, ती रेल्वेगाडी दिवा स्थानकात थांबली होती. अपघाताच्या दोन दिवसांनंतर स्थानक परिसरातील गर्दीची पाहणी केली असता, येथून नव्याने प्रवास करणारा प्रवासी प्रवास करुच शकत नसल्याचे दिसते. विशेषतः सकाळी ८ ते १०.३० या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या फलाटांवर पाय ठेवायलाही जागा नसते. सकाळी मुंबईत जाण्यासाठी काही नोकरदार फलाटावरुन रेल्वेगाडीत प्रवेश करण्याऐवजी धोकादायररित्या रेल्वे रुळ ओलांडत रेल्वेगाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. तर जलद रेल्वेगाडीत प्रवेश मिळविण्यासाठी महिला आणि पुरुष प्रवाशांची धक्काबुक्की, वादाचे प्रसंग घडतात. अनेकदा रेल्वेगाडीतील प्रवासी दिवा स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देत नाही. तर धिम्या रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हाच त्रास सहन करावा लागत आहे.
दिवा हे जंक्शन असूनही येथून प्रवास करणे कठीण ठरते. दिवा स्थानकात कर्जत, कसारा येथून सुटणाऱ्या जलद रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाड्या प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे या रेल्वेगाडीत प्रवेश मिळविणे शक्य होत नाही. कल्याण, बदलापूर भागातून सुटणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिवा स्थानकातून सीएसएमटी रेल्वेगाड्या सुरू करणे आवश्यक आहे. – विजय भोईर, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना, दिवा.