स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण मधील एका सायकल स्वाराने कल्याण ते इगतपुरी हे ७५ किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिवाजी चौकातील मुख्यालयातून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी या सायकल स्वाराला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर या युवा सायकल स्वाराची इगतपुरीच्या दिशेने सायकल वरुन धाव सुरू झाली. यावेळी पालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता व सायकलपटू प्रशांत भागवत उपस्थित होते.
कल्याण-पडघा-शहापूर-आटगाव मुंबई नाशिक महामार्गाने सायकल स्वार भूषण पवार यांनी सोलो सायकल राईडिंगला सुरूवात केली. प्रवासात लागणारी अत्यावश्यक लागणारी सामग्री, सायकलमध्ये बिघाड झाला तर दुरुस्तीचे साधने पाठीशी बांधली होती. सायकलच्या अग्रभावी तिरंगा ध्वज बांधण्यात आला होता.
भूषण पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पालिका मुख्यालयात त्याच्या चाहते, पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. आयुक्त डॉ. दांगडे यांनी भूषणला हिरवा झेंडा दाखविताच सर्वांचा निरोप घेत सायकलची धाव सुरू केली. त्यानंतर त्याचा वेग हळूहळू वाढत गेला. पडघा ते शहापूर प्रवास दरम्यान आलेले रस्त्यावरील चढ, उतार पार करत अवघड वळणवाटेचा इगतपुरीचा महत्वपूर्ण टप्पा पार केला.
या रस्त्यावरुन येजा करणारे इतर वाहनांमधील प्रवासी हात उंचावून भूषण यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत होते. मध्येच पाऊस, वारा, खड्डे यांना तोंड देत भूषणने इगतपुरीचा घाटमाथा यशस्वी पार केला. काही वेळ थांबवून त्याने पुन्हा परतीचा प्रवास सुरू करुन दुपारपर्यंत कल्याण गाठले. कल्याण मधील सायकल प्रेमींनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.