कल्याण – मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरू करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे मागील दोन ते तीन वर्षापूर्वीचे प्रयत्न तांत्रिक कारणामुळे यशस्वी होऊ शकले नाहीत. आता रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गावर मेमू लोकल सेवा (शटल) सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालीतील प्राथमिक टप्पा म्हणून कसारा घाट रेल्वे मार्गावर मेमू लोकलच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. लवकरच या चाचण्या पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठांनी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ सुत्राने सांगितले.

मुंबई ते नाशिक पर्यंतचा रेल्वे मार्ग हा कसारा घाट सोडला तर भूपृष्ठ समतल मार्गावर आहे. या समतल रेल्वे मार्गाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने मागील दोन ते तीन वर्षापूर्वी मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरू करता येईल का, या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. काही तांत्रिक अडथळ्यांमुळे रेल्वे प्रशासनाला हा प्रकल्प मार्गी लावता आला नाही. हा प्रकल्प आकाराला आला असता तर मुंबईहून नाशिक आणि नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना प्रत्येकवेळी मेल, एक्सप्रेसवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नव्हती.

आता रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गावर दिवा-वसई मेमू लोकल सेवेप्रमाणे मेमू लोकल (शटल) सेवा मुंबई नाशिक रेल्वे मार्गावर चालविता येईल का, यादृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या सेवेसाठी लवकरच कसारा घाटात मेमू लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. मेमू लोकल कसारा घाटात चढणीच्या मार्गावर असताना तिला किती अश्वशक्ती वीज पुरवठा लागतो. मेमू लोकल प्रवासी भार घेऊन कसारा घाटातून चढणीच्या मार्गाने किती अश्वशक्तीने जाऊ शकते आणि उतार मार्गिकेतून तांत्रिक अडथळे येऊ शकतात का. घाटातील बोगद्यातून ही लोकल धावताना काही तांत्रिक प्रश्न निर्माण होऊ शकतात का, अशा सर्व प्रकारच्या चाचण्या या चाचणीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत, असे रेल्वे सुत्राने सांगितले.

मेमू लोकलची लांंबी, रूंदी आणि उंची ही वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणे आहे. अशाच पध्दतीने मेमू लोकलची घडण आहे. मेमू लोकलला एकोणीस डबे प्रस्तावित आहेत. मेमू लोकलमध्ये लोकल वेगाला बळ देणारे सहा मोटर कोच आहेत. मेमू लोकलची अश्वशक्ती क्षमता पाच हजार ४०० टन आहे. मेमू लोकलची एकूण वजन क्षमता (टेअर) ५०० टन आहे. घाट माथा रेल्वे मार्गावर चढणीच्या वेळी मेमू लोकल धावण्यासाठी तिच्या वजनाच्या दुप्पट क्षमता असावी लागते.

मेमू लोकलमध्ये ही क्षमता अश्वशक्तिच्या चौपट उपलब्ध आहे. या चाचण्या प्राधान्याने घेण्याच्या सूचना रेल्वेच्या वरिष्ठांंनी करून यासंदर्भातचा सविस्तर अहवाल दाखल करण्याची सूचना केली आहे.

मुंबई नाशिक रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करावी ही प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. यामुळे प्रवाशांना एक्सप्रेसवर अवलंबून न राहता लोकल सेवेसारखे शटल सेवेने प्रवास करणे शक्य होणार आहे. या रेल्वे मार्गावर मेमू लोकलच्या चाचण्या घेऊन ही सेवा लवकर सेवेत येईल यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत. – शैलेश राऊत, अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.