ठाणे : आदिवासी-कातकरी समजाची परिस्थिती विदारक होत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर `आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली. संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवस उपाशी राहून आत्मक्लेश केला. या आंदोलनास शेकडो कातकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते कोर्टनाका भागात जमले आहेत. गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने दिली.

मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरु आहे. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे कातकरी खुलेआम उध्वस्ततेच्या मार्गावर उभा असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ `आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ आंदोलन पुकारले आहे.

निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कर्जबाजारीपणामुळे वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंध:कारात लोटले गेल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा हे देखील सहभागी झाले होते.

अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरु असताना संघटनेच्या प्रत्येक गावा पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करुन सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या – पाड्यात आपल्या घरा – दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवे लावले. गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत आहेत.

भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.