बंजारा आरक्षण : ठाणे : बंजारा समाजाने त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामाविष्ट करण्याची मागणी सुरु केल्याने आता आदिवासी समाजाने त्यास विरोध सुरु केला आहे. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते मुंबईतील मंत्रालय असा पायी मोर्चा काढला होता. हा मोर्चा सोमवारी मुंबई नाशिक महामार्गाने ठाण्यात दाखल झाला. यावेळी महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.
हैदराबाद गॅजेटिअरमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोमवारी बंजारा सामाजाने विविध ठिकाणी आंदोलन केले. तर आदिवासी सामाजाकडून आरक्षणाच्या मागणीस विरोध होत आहे. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.
याचे नेतृत्त्व अखिल भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, संदीप गवारी, गोरख रहेरे, प्रफुल फुटे यांनी केले. रविवारी हा मोर्चा शहापूर येथून निघाल्यानंतर रविवारी रात्री आंदोलकांनी कल्याण येथे विश्रांती घेतली. त्यानंतर सोमवारी पुन्हा मुंबई नाशिक महामार्गाने हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर मोर्चा पोहचताच, मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा, कॅडबरी जंक्शन भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालक आणि प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला.