ठाणे – गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे रेल्वे गाडीतील आरक्षण निश्चित व्हावे आणि त्यांचा कोकणचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या शुक्रवारपासून सुरु झाल्या आहेत. यामुळे आरक्षण खिडक्यांवर होणारी गर्दी विभागली जाणार असून कोकणवासियांची वेळ वाचण्यासह त्यांना रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील अनेकजण कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. रेल्वे गाडी, राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये काही महिने आधीच आरक्षण सुरू होते. मात्र, तिकीट खिडक्यांवर लांब रांगा लागतात. यामध्ये नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. अनेकदा आरक्षणही मिळत नाही. यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने कोकणचा प्रवास करावा लागतो.
बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र, आरक्षण खिडक्यांची अपुरी संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले चार वर्ष लावून धरली होती. संघटनेने ही मागणी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. त्यावर गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु शुक्रवार पासून सुरु झाल्या आहेत.
२० जून ते ५ जुलै २०२५ या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानका जवळील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या इमारती समोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक ७ आणि ८) सुरु राहणार आहेत.