कल्याण – कल्याण पश्चिमेतील अमरदीप वसाहती मधील सैनिक चाळ भागातील दोन १५ आणि १६ वर्षाच्या मुली मागील पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहेत. आपल्या मुलींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार यामधील एका मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
मानपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या २०२३ च्या कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या मुलींच्या बेपत्ता होण्याप्रकरणी एका मुलीची आई आशाबाई गणपत काळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या सैनिक चाळीत राहतात. त्या लिंबू मिरची विक्री करण्याचा व्यवसाय करतात.
हे कुटुंब मुळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पारधी तांडा, पांडाढरी गावचे रहिवासी आहे. घरातील दोन अल्पवयीन पळून गेल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या मुलींचा कुटुंबीय आपले नातेवाईक, परिसरात शोध घेत आहेत. ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून तक्रारदार यांची १५ वर्षाची मुलगी आणि तक्रारदार यांच्या नातेवाईक महिलेची १६ वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्या आहेत.
गणेशोत्सव सुरू आहे. या मुली कल्याणमधील आपल्या घर परिसरातील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी गेल्या असाव्यात असे कुटुंबीयांना वाटले. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्या घरी येतील असे कुटुंबीयांना वाटले. पण भोजनाची वेळ टळली तरी मुली घरी येत नाहीत म्हणून कुटुंबीयांनी घर परिसरात या दोन्ही मुलींचा शोध सुरू केला. या मुलींच्या शाळकरी मैत्रीणींच्या घरी जाऊन या मुलींबाबत विचारणा करण्यात आली. त्या तेथे नव्हत्या. मुली शोधुनही सापडत नसल्याने कुटुंबीय घाबरले.
कुटुंबाने कल्याण शहराच्या विविध भागात या मुलींचा शोध घेतला. नातेवाईकांना विचारणा करून मुली तुमच्याकडे आल्या आहेत का याची विचारणा केली. त्या आढळल्या नाहीत. मुली कोठेच आढळून येत नसल्याने त्यांना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करून मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी विशेष पथके तयार करून या बेपत्ता मुलींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याशिवाय साहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली करकडे याही स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.