कल्याण- येथील दोन ज्येष्ठ नागरिकांची भामट्यांनी वेगळ्या व्यवहारांमध्ये सात लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. दैनंदिन खर्चासाठी लागणारा पैसा भामट्यांनी परस्पर वळता करुन घेतल्याने याप्रकरणी दोन्ही नागरिकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

वाडेघर येथील शितला मंदिराजवळ राहणारे विठ्ठल मुंगळे (७२), त्यांचे सहकारी राकेशकुमार सिंह (४८) अशी फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे आहेत. मुंगळे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. मुंगळे यांनी आपली सेवानिवृत्ती आणि इतर लाभातून मिळालेली रक्कम पारनाका येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत ठेवली आहे. गेल्या महिन्यात मुंगळे वर्धा येथे गावी असताना त्यांना मी महाराष्ट्र बँकेतून बोलतो. तुमचे केवायसी केले नाही. ते तात्काळ करा, असे सांगून मुंगळे यांच्याकडून समोरील इसमाने ऑनलाईन माध्यमातून बँक व्यवहाराची सर्व माहिती घेतली. आपण फसविले जात आहोत याची थोडीही कल्पना मुंगळे यांना आली नाही. संध्याकाळी मुंगळे यांनी मुलगा विवेक याला घडला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना संशय आला.

हेही वाचा >>> ठाण्यात राज ठाकरेंची उद्या जाहीर सभा; मनसेच्या वर्धापनदिन होतोय पहिल्यांदाच ठाण्यात साजरा

रात्रीच्या वेळेत १० ते १०.३० वेळेत मुंगळे यांना बँकेतून व्यवहार झाल्याचे लुघसंदेश आले. त्यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यांनी बँकेतून जाऊन खात्री केली तेव्हा त्यांच्या बँक खात्यामधून सहा लाख ३९ हजार रुपये परस्पर काढून घेतले होते.

अशाच पध्दतीने राकेशकुमार सिंह यांना तुम्ही विजेचे देयक भरणा केले नाही. आता तुमच्या घराचा वीज पुरवठा बंद होईल असे सांगून समोरील भामट्याने एक मोबाईल क्रमांक पाठवून त्यावर संपर्क करण्यास सांगितले. मोबाईलवर टीमव्हीव्हर नावाने उपयोजन आले. ती जुळणी उघडताच सिंह यांच्या बँक खात्यामधून ९९ हजार ५०० रुपये भामट्याने वर्ग करुन घेतले. पैसे वर्ग होताच सिंह यांना बँकेतून लघुसंदेश आला. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे समजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह, मुंगळे यांनी ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक झाल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन घेतला आहे.