डोंबिवली- आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या दोन महिलांची दोन वेगळ्या वेळांमध्ये फसवणूक करुन दोन चोरट्यांनी महिलांची गळ्यातील सोन्याचा ऐवज, रोख असा एकूण एक लाखाचा ऐवज लुटून नेला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत या महिला आपल्या मुलांना सोडण्यासाठी आल्या होत्या.

सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्त्यावर आता भुरट्या चोरट्यांचा वावर वाढल्याने पादचारी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

सुरेखा सुरेश नाचणकर (रा. समर्थ कृपा चाळ, सरोवरनगर, डोंबिवली पश्चिम), भामाबाई देवराम जाधव (रा. ओमशांती निवास, जयहिंद काॅलनी, डोंबिवली) अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत.

हेही वाचा- >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

पोलिसांनी सांगितले, सुरेखा नाचणकर या रविवारी आपल्या मुलाला महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत सोडण्यासाठी सकाळी दहा वाजता आल्या होत्या. मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्या रस्त्यावर घरी जाण्यासाठी रिक्षेची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात दोन अनोळखी इसमांनी संगनमत करुन सुरेखा संम्मोहित करुन त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांच्या गळ्यातील ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम काढून घेतली. घरी गेल्यानंतर सुरेखा यांना गळ्यात मंगळसूत्र जवळील पैशाचा बटवा गायब असल्याचे दिसले. भानावर आल्यानंतर त्यांना आपणास भामट्यांनी लुबाडले असल्याचे जाणवले. त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.

असाच प्रकार रविवारी सकाळी साडे अकरा वाजता महात्मा गांधी विद्यामंदिर ते जयहिंद काॅलनी दरम्यान तक्रारदार भामाबाई जाधव यांच्या बाबतीत घडला. मुलाला गांधी विद्यामंदिरात सोडल्यानंतर त्या रिक्षेने घरी जाण्यासाठी रिक्षेची वाट पाहत होत्या. यावेळी भामाबाई यांना दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवणूक त्यांना संम्मोहित करुन त्यांचे लक्ष विचलित केले. त्यांच्या गळ्यातील ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने काढून पळून गेले. भानावर आल्यावर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याचे भामबाई यांना दिसले. रस्त्याला भेटलेल्या भामट्यांनीच हे कृत्य केले असावे असा अंदाज घेऊन त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही चोरीमध्ये दोन्ही भामटे एकच असण्याचा अंदाज बांधून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी तपास सुरू केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत महिलांना लुबाडणारे चोरटे वाढल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. शाळांच्या परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात करुन चोरट्यांना पकडण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारचे भामटे डोंबिवली पश्चिमेत सक्रिय झाले होते. शाळांमध्ये मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या महिलांनी किमती ऐवज, मोठी रक्कम जवळ बाळगू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.