बदलापूर: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधर पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याच्या बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्व सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता नदीची पातळी बदलापुरात १७.५० मीटरवर होती. उल्हास नदीची ही धोका पातळी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. उल्हास खोऱ्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान, नेरळ, भीमाशंकर या परिसरात सातत्याने पाऊस होतो. आहे त्यामुळे नदीच्या पात्रात वाढत होते आहे. पाऊस सुरू राहिल्यास पुराचा धोका आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणारी उल्हास नदी त्यामुळे दुथडी भरून वाहते आहे. मंगळवारी उल्हास खोरे असलेले कर्जत, नेरळ, माथेरान तसेच भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस झाला. परिणामी उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. सायंकाळनंतर उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. परिणामी बदलापूर कल्याण ग्रामीण मधील गावांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.
रात्री उशिरा उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली होती. बुधवारी पहाटे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. बदलापूर शहरातील सखल भागातही पाणी साचले होते. तर कल्याण ग्रामीण मधील म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, पाचवामैल, रायते, आपटी या भागात नदी किनाऱ्याच्या भागात पाणी साचले. कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने मंगळवारी रात्री अनेकांना स्थलांतरित करण्यात आले होते.
बदलापूर: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याच्या बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. https://t.co/2jrmCKvB4K#Heavyrain #rain #thane #Badlapur
— LoksattaLive (@LoksattaLive) August 20, 2025
(सौजन्य… pic.twitter.com/v0xDgcIrms
दरम्यान बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पात्रात वाढ कायम आहे. बारवी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सात वाजता २३५ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. बारवी धरणाच्या सर्व ११ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बारवी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे.