उल्हासनगरः परतीच्या पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांतील कोरड्या चिखलामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या त्रासाने शहरभर अक्षरशः धुरकट वातावरण तयार झाले आहे. पावसात खड्डे बुजवता येत नसल्याचे कारण देणाऱ्या पालिकांनी आता तरी युद्धपातळीवर कामाला लागावे, अशी नागरिकांची संतप्त मागणी आहे.

पाच महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे. अनेक मुख्य मार्ग आणि अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी पोखरलेले असून, पावसाचे पाणी जाऊन खड्डे अधिक खोल झाले. त्याच खड्ड्यात चिखलही मोठ्या प्रमाणावर साचला होता. आता त्यातील पाणी सुकण्यास सुरूवात झाली असली तरी या खड्ड्यांतील चिखलाचे धुळीत रूपांतरित होते आहे. ही धूळ वाऱ्यासह हवेत उडत असल्याने वाहनधारक, पादचारी, रिक्षाचालक आणि व्यापारी वर्ग प्रचंड त्रस्त झाले आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील कल्याण–बदलापूर राज्य महामार्ग, शांतीनगर, फॉलोवर लाईन, उल्हासनगरचे प्रवेशद्वार, कॅम्प ३ परिसर तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर धुळीचे ढग दाटलेले दिसतात. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांची वर्दळ वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट होते.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही चित्र वेगळं नाही. सीसीटीव्ही वाहिन्या, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांसाठी रस्ते खोदून ठेवले गेले, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर पेव्हर टाकणे वा डांबरीकरण करण्याकडे पालिकांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर व चौकांत धुळीचे थर साचले आहेत. अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात डोंगर भागातून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे चिखल रस्त्यावर येत असून त्यामुळे धुळ पसरते आहे. टी जंक्शन भागातही हीच स्थिती आहे.

आरोग्याचा प्रश्न

पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींचा धोका कायम असतानाच आता धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला आहे. अनेकांना शिंक, खोकला, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवू लागली आहेत. डॉक्टरांच्या मते, “रस्त्यावरील धूळ ही सूक्ष्म कणांनी भरलेली असते आणि ती थेट फुफ्फुसांमध्ये पोहोचते. दीर्घकाळ या धुळीत राहिल्यास दीर्घकालीन आरोग्य बिघडू शकते.” आधीच अंबरनाथ शहरात रात्रीच्या वेळी औद्यगिक वसाहतींमधून रासायनीक वायू सोडल्याने शहरात धुक्याचे वातावरण निर्माण होते. त्यात या धुळीची भर पडते आहे. पावसाळ्यात “पावसामुळे काम करता येत नाही” असे सांगणाऱ्या पालिकांकडून आता काहीतरी ठोस उपाययोजना अपेक्षित असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते आहे.