उल्हासनगर: गेल्या अनेक महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे उल्हासनगर शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. त्यावरून राजकारणही रंगले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती पाहता उल्हासनगर महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेला वेग दिला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे भरले जात असून दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यंदा पाच महिने लांबलेला मोसमी पाऊस आणि त्यातही संततधार पावसामुळे सर्वच शहरातील डांबरी रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उल्हासनगर शहरात बहुतांश डांबरी रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळाली. शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. राज्यमार्ग, महत्वाचे चौक, अंतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दररोज शहरातल्या कोणत्या ना कोणत्या भागात वाहतूक कोंडी कायम होती. कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला. उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारावर सध्या खोदकाम सुरू आहे. त्यापुढे रस्त्यावर खड्डे होते. पुढे फॉरवर लाईन चौकात मोठ्या प्रमाणावर खड्डे होते. तेथून मध्यवर्ती रुग्णालय रस्ता, अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी भरले होते.

कल्याण बदलापूर रस्त्यावरच अशोक अनिल सिनेमा, शांती नगर भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती. शहरातल्या उड्डाणपुलांवरही अशीच स्थिती होती. त्यामुळे रिक्षाचालक, दुचाकीस्वारांना त्याचा मोठा फटका बसत होता. अनेकदा रूग्णवाहिका, शाळेच्या बस, वाहनांना त्याचा फटका बसला. गणेशोत्सवाच्या काळात पालिका प्रशासनाने शहरात मास्टिंगचा प्रयोग सुरू केला. त्यात काही अंशी यश आले. मात्र पुन्हा पावसाची सुरूवात झाल्याने जिथे मास्टिंग झाले नाही तिथले खड्डे वाढले. त्यामुळे गणेशोत्सवानंतर पुन्हा खड्ड्यांची स्थिती जैसे थे होती.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने पालिका प्रशासनाने पुन्हा खड्डे भरण्याचा कामाला सुरूवात केली. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करत खड्डे भरण्याच्या कामाला वेग देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अभियांत्रिकी शाखेच्या पथकांनी तत्काळ काम हाती घेतले आहे.

सध्या उल्हासनगर-२ मधील नेहरू चौक ते फॉलवर लाईन या मार्गावरील जवाहर हॉटेल समोर, शहिद अरूणकुमार वैद्य सभागृह, शासकीय मध्यवर्ती रूग्णालय, सेवासदन महाविद्यालयासमोर, हरदासमल हॉटेल परिसर, नेहरू चौक या ठिकाणी खड्डे भरण्याची आणि डांबरीकरणाची कामे सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आहेत. याशिवाय कमला नेहरू नगर, धोबीघाट, उल्हासनगर-१, फर्निचर मार्केट, लिंक रोड परिसर, उल्हासनगर-३, तसेच टर्निंग पॉइंट ते मधुबन चौक या उल्हासनगर कॅम्प २ भागातही रस्त्यांवरही खड्डे दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यामुळे शहरातील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त आणि सुरक्षित करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.