उल्हासनगरः विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशेळे गाव आणि पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी दहशती निर्माण करणारा सुमित कदम उर्फ लाला अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. याआधी त्याने गाड्यांची आणि दुकानांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली होता. याचवेळी त्याने तलवारीच्या धाकाने महिलेसह अनेकांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

या गंभीर मुद्द्याला गांभीर्याने घेत आमदार सुलभा गायकवाड यांनी तो थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता. स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोष आणि भीती लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात विशेष कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक बी.आर. दराडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे यांचा समावेश होता. शनिवारी पथकाने आशेळे गाव परिसरात संयुक्त कारवाई करत सुमित उर्फ लाला कदम याला पकडले.

अटकेनंतर रविवारी पोलिसांनी एक अनोखी कारवाई करत त्याची थेट “धिंड” काढून नागरिकांसमोर सादर केले. पोलिसांच्या या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्याची असलेली दहशत कमी झाली. याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे मनापासून कौतुक केले. पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की, गुंडगिरी, दहशत निर्माण करणे, तोडफोड किंवा धमकावणे यांसारखे प्रकार सहन केले जाणार नाहीत. भविष्यात अशा गुन्हेगारांना देखील याच पद्धतीने कठोर धडा शिकवला जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे आशेळे गाव आणि परिसरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांच्या भीतीत जगणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

यापूर्वीही धिंड

अल्पवयीन मुलींचा विनभंग करून त्यासाठी कोठडी भोगून जामीनावर सुटलेल्या एका आरोपीने उल्हासनगरात त्याच विनयभंग केलेल्या तक्रारदार मुलींच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार केला होता. यावेळी त्याने मिरवणूक काढत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मिठाई वाटत, ढोल वाजवत त्याच्या समर्थकांनी आनंदही साजरा केला होता. त्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोपींची पोलिसांनी धिंड काढली होती.