उल्हासनगर : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक ५ मधील गणेश नगर परिसरात रविवारी सायंकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागात असलेल्या नाल्यावरील जुना पूल कोसळला आहे. सुदैवाने जात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरातील ५०० पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला असून नागरिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे या पुलाच्या कोसळण्याच्या क्षणी पुलावरून जाणारी एक तरुणी केवळ अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने थोडक्यात बचावली आहे.
उल्हासनगरच्या गणेश नगरमधील या पूलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय होती. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी या धोकादायक पूलाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. विविध आंदोलनं, निवेदनं, व लेखी तक्रारींमधून नव्या पुलाची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र महापालिका प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष करत ही मागणी डावलली. परिणामी, अखेर मुसळधार पावसाच्या तडाख्याने पूल कोसळला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे भीषण रूप समोर आले.
या घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी महापालिकेविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. आमचा मुख्य मार्गच बंद झाला असून, लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. आता या पावसातच खोल नाल्यातून वाट काढत जायचे का असा संताप अनेकांनी व्यक्त केला आहे. तर येणाऱ्या दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ पावले उचलावीत आणि नवा पूल उभारण्यास सुरुवात करावी, अशी मागणी आता केली जात आहे.