कल्याण अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी या मार्गातील महत्वाचा टप्पा असलेल्या शहाड पुलाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नव्हता. अखेर एमएमआरडीएच्या वतीने या पुलाच्या विस्तारीकरणाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला १० मीटर असलेला हा पूल ३० मीटर केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान विश्वस्तपदासाठी रविवारी निवडणूक; चार नवीन चेहऱ्यांना संधी

कल्याण अहमदनगर मार्गाला गेल्या वर्षात राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम केले जाते आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वपूर्ण मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. अहमदनगर जिल्ह्याला थेट जोडणारा हा मार्ग भाजीपाला, दूध आणि इतर शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. प्रवासी वाहतुकही यामार्गावरून मोठ्या प्रमाणावर होत असते. या मार्गावर आता उल्हासनगर पल्याड कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातही नागरिकरण होऊ लागले आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या वाहतुकीसोबत स्थानिक वाहतुकहीचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाचे रूंदीकरण होत असले तरी या मार्गातील कल्याण शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे शहाड कोंडीत अडकले आहे. येथे असलेला उड्डाणपूल सर्वाधिक कोंडीचा पूल म्हणून ओळखला जातो. कल्याणमधून उल्हासनगर शहरात प्रवेश करण्यासाठीही हा उड्डाणपूल महत्वाचा आहे. मात्र दोन्ही टोकांना रूंद रस्ते आणि मधोमध हा अवघ्या १० मीटरचा अरूंद पूल कोंडीसाठी कारणीभूत ठरतो. येथून वाहने वळवताना कोंडी होते. त्यामुळे या पुलाला पर्याय द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती.

हेही वाचा >>> दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर या पुलाच्या विस्तारीकरणाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी जाहीर केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदरासंघातील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजीत केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच त्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. सध्याच्या घडीला हा पूल १० मीटर रूंद आहे. त्याची रूंदी ३० मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. त्यामुळे कल्याण आणि उल्हासनगरच्या मध्ये होणारी कोंडी सुटेल.