उल्हासनगर: अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील अनेक वर्दळीच्या चौकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक सिग्नल यंत्रणा सातत्याने बंद पडते आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सिग्नल यंत्रणांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यांचा उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कल्याण ते बदलापूर या दरम्यान गेल्या काही वर्षात लोकसंख्या, वाहनांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे या भागातील रस्ते सध्या वाहनांनी भरलेले दिसतात. चौकाचौकात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहून ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही शहरांमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर सुमारे एक वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. अंबरनाथ नगरपालिकेने कल्याण-बदलापूर महामार्गाव्यतिरिक्त शहरांतर्गत असलेल्या स्वामी समर्थ चौक आणि गोविंदपुल बायपास रस्त्यावरही ही यंत्रणा बसवली होती. सुरुवातीला या सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागली आणि अनेक चौकांमधील कोंडी कमी झाली.

मात्र, काही दिवसांनंतर ही यंत्रणा वारंवार बंद पडू लागली आहे. कल्याण-बदलापूर मार्गावरील, उल्हासनगरच्या साईबाबा मंदिर चौक आणि सतरा सेक्शन येथील सिग्नल तसेच अंबरनाथमधील स्वामी समर्थ चौक आणि बाह्यवळण रस्त्यावरील सिग्नल वारंवार बंद पडत आहेत. अनेकदा येथे फक्त पिवळे दिवे सुरू असतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. परिणामी सगळीच वाहने एकाच वेळी चौकातून मार्गक्रमण करत असतात. ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात घडत आहेत.

या सिग्नल यंत्रणांवर दोन्ही नगरपालिकांनी कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही, तांत्रिक अडचणी आणि देखभाल-दुरुस्तीचा अभाव यामुळे त्या बंद पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या समस्येबद्दल पालिका आणि वाहतूक विभागाला विचारणा केली असता, दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, यंत्रणांच्या या बेजबाबदारपणामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बेशिस्तांना रोखणार कोण

सिग्नल बंद असो वान सुरू असो अशा दोन्हीवेळी अनेकदा वाहनचालक बेशिस्तीचे दर्शन देतात. त्यामुळे कोंडी होते. अशावेळी या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी तिथे काही यंत्रणा नसते. त्यामुळे या बेशिस्तांना रोखणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. वाहतूक पोलीस फॉरेस्ट नाका ते टी जंक्शन, टी जंक्शन ते आनंदनगर प्रवेशद्वार अशा मध्यभागी वाहनांची तपासणी करताना दिसतात. मात्र त्याचवेळी टी जंक्शन, आनंद नगर प्रवेशद्वार अशा दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.