उल्हासनगरः नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने तब्बल ११ लाख ८१ हजार ५९५ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीने स्वतःला क्रिप्टोग्लोबल कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. या प्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी व्यक्तीस व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एक क्रिप्टोग्लोबल ही कंपनी असल्याचे सांगून ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावता येतील, असे सांगितले. सुरुवातीला फिर्यादीच्या खात्यात १५ हजार ६०० रूपये जमा करून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध बँक खात्यांमधून मोठ्या रकमा पाठविण्यास भाग पाडले.
फिर्यादी व्यक्तीकडून बँक ऑफ बडोदा मधून ८५ हजार, इंडियन बँक मधून १ लाख २८ हजार ५३०, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १लाख २५ हजार तर फिर्यादीच्या कंपनी मालकाच्या खात्यातून ४ लाख ८० हजार रूपये रक्कम उकळण्यात आली. आरोपीने ही सर्व रक्कम स्वतःच्या युपीआय आयडीवर पाठवून घेतली आणि नंतर सर्व गुंतवलेली रक्कम तसेच कमिशन परत देतो, असे खोटे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर कोणतीही परतफेड झाली नाही, त्यामुळे फसवणूक उघडकीस आली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा कोणत्याही अमिषांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
यापूर्वीही फसवणुकीचे प्रकरणे
यासारखी अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात समोर आली आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यासारख्या शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. यात अनेक प्रकरणी शेअर बाजारातील गुंतवणूक, गुंतवणुकीत मिळणारा अधिकचा नफा, एकाचे दुप्पट पैसे करून देणे अशा प्रकारांचा यात समावेश आहे. नोकरीच्या देण्याचे अमिष दाखवून यापूर्वीही अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.