डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील सखाराम काॅम्पलेक्स गृहसंकुलाजवळील स्वामी समर्थ मठासमोरील भागात तीन भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी केली. निर्भय बनो संस्थेच्या पदाधिकाऱ्याने या बेकायदा इमारतीवरील कारवाईसाठी पालिकेत पाठपुरावा केल्याने अखेर पालिकेच्या ह प्रभागाने या बेकायदा इमारत प्रकरणातील जमीन मालक, बांधकामधारक आणि साथीदारांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा बांधकामांची उभारणी करणारा भूमाफिया आदित्य बिल्डकाॅनचे प्रफुल्ल गोरे यांचाही याप्रकरणात सहभाग आहे. डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातही त्यांचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपरमधील सखाराम नगर काॅम्पलेक्समधील स्वामी समर्थ मठासमोरील जागेत ही बेकायदा इमारत चार वर्षापूर्वी उभारण्यात आली आहे. निर्भय बनोचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून मागील चार वर्षापासून पालिकेत पाठपुरावा केला होता.

ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त अरूण पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बांधकामधारक सुरज ज्ञानेश्वर बुट्टे, आदित्य बिल्डकाॅनचे संचालक प्रफुल्ल गोरे, जमीन मालक काळ्या कृष्णा जोशी यांच्या विरुध्द बनावट कागदपत्रे, बेकायदा इमारत प्रकरणी गुन्हा दाखल केला.

अधीक्षक पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की बांधकामधारक सुरेश बुट्टे, प्रफुल्ल गोरे आणि काळ्या जोशी यांनी कोपर सखारामनगर काॅम्पलेक्स भागात स्वामी समर्थ मठासमोर सात माळ्याच्या बेकायदा इमारती उभारणी केली. या इमारतीविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बांधकामधारकांना बांधकाम परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. चार वर्षापूर्वी हे बांधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वताहून तोडून टाकण्याचे बांधकामधारकांना कळविले होते. या नोटिशींना न जुमानता बुट्टे, गोरे आणि जोशी यांनी बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना विक्री केल्या.

निर्भय बनोचे महेश निंबाळकर यांनी या भूमाफियांवर पाणी चोरी आणि एमआरटीपीचे गुन्हे दाखल करून पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करावी म्हणून पालिकेत पाठपुरावा सुरू ठेवला होता. निंबाळकर यांच्या रेट्यामुळे अधीक्षक पाटील यांनी साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाफिया सुरज बुट्टे, प्रफुल्ल गोरे आणि जोशी यांच्या विरुध्द पालिकेच्या नोटिसीचे अनुपालन न करणे, इमारत उभारणीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के मारून नकली बनावट बांधकाम तयारी केली. या प्रकरणात पालिकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभारखाणपाडा येथील खाडी किनारा भागातील दहा इमारतींचा शिवसावली गृहप्रकल्प, डोंबिवलीतील दत्तनगरमधील बेकायदा इमारत उभारणीत गोरे यांचा सहभाग आहे. त्यांच्यावर बांधकाम प्रकरणी एकूण तीन ते चार गुन्हे दाखल आहेत.