ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील प्रसिद्ध असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी संस्थानाच्या अपहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मनोज प्रधान याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्याला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ातील वज्रेश्वरी भागात श्री वज्रेश्वरी योगिनी संस्थानाचे मंदिर आहे. २०१४ ते २०१८ या  कालावधीत मनोज प्रधान याच्याकडे मंदिराचे अध्यक्षपद होते. या कालावधीत संस्थानाला मिळालेल्या देणगीचा अपहार केल्याप्रकरणी मनोज प्रधान याच्या विरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. मात्र, ठाणे सत्र न्यायालयाने जानेवारी महिन्यात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.

या निर्णयाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सप्टेंबर महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत प्रधानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात प्रधानने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vajreshwari yoginidevi trust fraud manoj pradhan arrest certain zws
First published on: 18-10-2019 at 02:49 IST