कल्याण : शासन निर्णयाप्रमाणे कल्याण डोंंबिवली पालिकेने घेतलेला मटण मांस विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्याने शुक्रवारी सकाळी हिंदु खाटिक समाज, धर्मवीर खाटिक समाज संस्था, काँग्रेस आणि विविध सामाजिक संस्थांनी पालिकेवर मोर्चा आणून जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर हातात कोंंबड्या घेऊन कोंबड्यांचा कलकलाट केला. एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना दुसरीकडे पालिकेच्या मुख्यालया समोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करताना पोलिसांची दमछाक होत होती.

शासन अध्यादेशाप्रमाणे आपण आदेश काढला आहे. यात नवीन असे काही नाही, अशी भूमिका घेत पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मटण विक्रीचा बंद आदेश मागे घेण्यास नकार दिला. हा आदेश मागे घ्यावा म्हणून पालिकेत हिंदु खाटिक समाज, ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि इतर समाज संस्थांनी पत्रे दिली होती. पालिकेने आपला निर्णंय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.

पालिका मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घेत नसल्याचे लक्षात आल्यावर शुक्रवारी सकाळी हिंदु खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयावर धडक मारली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शिवाजी चौक, शंकरराव चौक ते पालिका मुख्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हिंदु खाटिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचे प्रवेशव्दार घोषणांनी दणाणून सोडले. काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हा संघटक कांचन कुलकर्णी, प्रदेश पदाधिकारी ॲड. नवीन सिंग आणि कार्यकर्ते दोन्ही हातात कोंबड्या घेऊन पालिकेच्या प्रवेशव्दारावर धडकले. ‘दाबा लोकशाहीचे बटण, दाबून खा आज मच्छी मटण’ अशा घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिका परिसर दणाणून सोडला. ठाकरे गट, मनसेचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पातकर, मटण विक्रेते गटाने या आंदोलनात सहभागी झाले होते.

पालिकेचे मुख्य प्रवेशव्दार सुरक्षा रक्षकांनी बंद केले होते. कार्यकर्ते हातामधील कोंबड्या पालिका मुख्यालयात सोडण्यासाठी जागा शोधत होते. जागोजागी पोलीस असल्याने कार्यकर्त्यांचे मनसुबे साध्य होत नव्हते. आंदोलन सुरू होण्यापूर्वी बाजारपेठ पोलिसांनी सकाळी सात वाजताच आंदोलनकर्ते ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर, धर्मवीर खाटिक समाजाचे परवेझ शेख, हसीम शेख यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले.

झेंडावंदनासाठी पालिका मुख्यालयात आलेले अधिकारी आपल्या दालनांमध्ये बसून होते. बाहेर आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. त्यात कोंबड्यांच्या काॅक काॅक आवाजाने परिसरात गोंधळ आणि कलकलाटाची भर पडली होती. पावसाची रिपरिप, त्यात कोंबड्या, आक्रमक कार्यकर्ते असे चित्र पालिकेसमोर होते.

स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्या मटण खाण्यावर पालिकेने बंदी आणली. नागरिकांच्या हक्काची पालिकेला जाणीव व्हावी आणि पहाटेच्यावेळी जाग आणण्याचे काम कोंबडा करतो. त्यामुळे हा जाग आणणारा कोंबडा, कोंबड्या पालिकेसमोर आणून आम्ही प्रशासनाला यापुढे तरी चुकीचे निर्णय घेऊ नका असा इशारा जाग आणणाऱ्या कोंबड्यांच्या माध्यमातून दिला आहे. सचिन पोटे जिल्हाध्यक्ष, कल्याण काँग्रेस.