ठाणेः गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. परिणामी, बाजारातील भाज्यांची आवक घटली असून, घाऊकसह किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

किरकोळ बाजारात भेंडी, फरसबी, गवार, घेवडा, शिमला मिरची, तोंडली, वांगी या भाज्यांनी शंभरी पार केली आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक तसेच परराज्यातून मोठ्याप्रमाणात भाज्यांचा आवक होत असते. दररोज ६५० ते ७०० भाज्यांच्या गाड्या वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत दाखल होतात. त्यानंतर, या भाज्या मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.

बाजारसमितीत पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांची माल खरेदीसाठी गर्दी होत असते. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत भाज्यांची आवक घटल्याचे चित्र आहे. मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भाज्या खराब झाल्या आहेत. परिणामी, या जिल्ह्यांमधून बाजारसमितीत होणाऱ्या भाज्यांच्या पुरवठ्यात घट झाली आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज, केवळ ५७३ भाज्यांच्या गाड्या दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. गेले दोन ते तीन दिवसांपासून भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात काही भाज्यांनी थेट शंभरी गाठली आहे. एकीकडे नवरात्रौत्सव सुरु आहे, त्यामुळे भाज्यांची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. परंतु, सद्यस्थितीला मागणीनुसार भाज्यांचा पुरवठा होत नसल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.

किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे..

पावसामुळे बाजारात भाज्या कमी येत आहे. त्यापैकी काही भाज्या प्रचंड महाग झाल्या आहेत. त्यामुळे त्या भाज्यांचा माल विक्रीसाठी घेणे आम्हाला परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही अशा भाज्या कमीप्रमाणात खरेदी करत आहोत. यामध्ये विशेषकरुन उत्तम दर्जेची गवार, तोंडली, कारले, वांगी अशा भाज्यांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे येथील किरकोळ भाजी विक्रेत्या शुभांगी तनपुरे यांनी दिली.

भाज्यांचे दर

भाजी             घाऊक             किरकोळ
भेंडी                         ५२             १२०
फरसबी             ५०             १००
गवार                        १००             १६०
घेवडा                        ३८             १००
कारली             २४                         ८०
कोबी                        १६                         ६०
शिमला मिरची३०                        १००
पडवळ             ३६                        ८०
तोंडली             ५०                        १६०
टोमॅटो             २४                         ४०
वांगी                        ४०                         १००