ठाणे : आंटी म्हणाला म्हणून एका महिलेने तिच्या पाच ते सहा साथिदारांसह भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण केली. हिरानंदानी इस्टेट भागात हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भाजीविक्रेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हिरानंदानी इस्टेट भागात २९ वर्षीय भाजी विक्रेत्याचे दुकान आहे. परिसरातील काही सदनिकाधारक त्याला व्हाॅट्स ॲपवर संदेश पाठवून त्याच्याकडून भाजी खरेदी करतात. त्यानंतर तो घरपोच भाजी देत असतो. हिरानंदानी इस्टेट भागात राहणारे एक कुटुंबिय मागील १० वर्षांपासून त्याच्याकडून भाजी खरेदी करतात. अनेकदा भाजीचा दर्जा किंवा इतर खरेदीच्या कारणावरुन त्या कुटुंबियासोबत त्या भाजी विक्रेत्याचे खटके उडत असे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादातून भाजी विक्रेत्याला मारहाण झाली होती. त्यामुळे याप्रकरणी भाजी विक्रेत्याने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. तर त्या कुटुंबियातील एकाच्या तक्रारीवरुन भाजी विक्रेत्यावरही अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, २० जुलैला दुपारी १ वाजताच्या सुमारास भाजी विक्रेता दुकानामध्ये असताना एक महिला चेहऱ्यावर कापड बांधून त्यांच्या दुकानात भाजी खरेदीसाठी आली होती. त्यावेळी भाजी विक्रेता तिला आंटी कॅरेट द्या असे म्हणाला. तरुणीने आंटी का म्हणाला या कारणावरुन वाद सुरु केला. त्यानंतर आणखी पाच ते सहाजण तेथे आले. त्यांनी महिलेची छेड काढतो असे म्हणत भाजी विक्रेत्याला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या सोबत वाद घालणाऱ्या संबंधित कुटुंबाचे नाव घेत त्यांच्याशी भांडण केले ना? असे म्हणत त्याला मारहाण सुरु ठेवली.
परिसरात नागरिक गोळा झाल्यानंतर ते तेथून निघून गेले. यानंतर भाजी विक्रेत्याने दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर भाजी विक्रेत्याच्या वडिलांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या कुटुंबातील महिलेच्या पतीने आम्हाला मारण्याच्या उद्देशाने काही लोक पाठविले असा त्याने आरोप पोलीस ठाण्यात जाऊन केला. त्याने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ११८ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), ३३३, ४९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरु झाला आहे.