पूर्वा साडविलकर

समाधानकारक आवक आणि घाऊक बाजारात स्थिर दर असतानाही इंधन दरवाढीचे कारण पुढे करत मुंबई महानगरातील जवळपास सर्वच शहरांमध्ये कृषिमालाच्या दरांमध्ये या आठवडय़ात वाढ झाली.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांना प्रामुख्याने पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्य़ातून भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. या भागातून होणारा भाज्यांचा पुरवठा कमी झाला की घाऊक आणि किरकोळ बाजारात दरवाढ होते हे नेहमीच गणित आहे. साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या भागातून होणारा भाज्यांचा पुरवठा उत्तम असतो. यंदाही तो सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात सुरू आहे. वाशी येथील घाऊक बाजारात कांद्यासारखा अपवाद वगळला तर इतर भाज्यांचे दरही स्थिर आहेत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांचा दरांवर दिसू लागला असून किरकोळ बाजारात आठवडय़ाच्या तुलनेत सर्वच भाज्या १० ते २० रुपये अधिक दरांनी विकल्या जात असल्याचे चित्र आहे.

वाशी येथील घाऊक बाजारात फारशी वाढ नसताना किरकोळ बाजारात झालेल्या दरवाढीमागे इंधनाचे वाढलेले दर हेच कारण आहे, असा दावा व्यापारी करत आहेत.

– कांदेही महाग

एक आठवडय़ापूर्वी किरकोळ बाजारात ५० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री केली जात होती. कांद्याच्या दरात पुन्हा दहा रुपयांनी वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात ६० रुपये प्रति किलोने कांदा विक्री केला जात आहे. स्वयंपाक करताना फोडणीसाठी गृहिणी कांद्याचा वापर मोठय़ा प्रमाणात करत असतात. कांद्याचे दर वधारल्याने गृहिणींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होत असल्याचे ठाण्यातील किरकोळ बाजारातील कांदे विक्रेत्यांनी सांगितले.

– कोंबडी दरही वाढला

बर्ड फ्लूमुळे काही दिवसांपूर्वी कोंबडय़ांची मागणी कमी झाली होती. त्यामुळे दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. बर्ड फ्लूची साथ आटोक्यात आली असून तसेच कोंबडीचे मांस सेवन केल्याने कोणाताही धोका नाही, असे वारंवार सांगितले जात असल्यामुळे पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. बर्ल्ड फ्लूच्या साथीमुळे मोठय़ा संख्येने कोंबडय़ा दगावल्याने सध्या बाजारात कोंबडय़ांची आवक कमी प्रमाणात होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे कोंबडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. एक आठवडय़ापूर्वी १०० रुपये किलोने विकली जाणारी ब्रॉयलर कोंबडी सध्या १२० रुपये किलोने विकली जात आहे, तर २०० रुपये किलोने विकली जाणारी गावठी कोंबडी सध्या २२० रुपये किलोने विकली जात आहे, अशी माहिती ठाण्यातील कोंबडी विक्रेते चंद्रशेखर तेरडे यांनी दिली.

भाज्या   घाऊक किरकोळ

फरसबी ४०  ६०

फ्लॉवर १४  ३०

गवार ६०        ८०

घेवडा ४०  ६०

टोमॅटो २४  ४०

झाले काय?

या आठवडय़ात किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर किलोमागे १० ते २० रुपयांनी वधारले असून कोंबडय़ांचे दरही किलोमागे २० रुपयांनी वाढले. पेट्रोल दरवाढीनेच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याचा दावा व्यापारी करत आहेत.

दरबदल..

* एक आठवडय़ापूर्वी किरकोळ बाजारात ४० रुपये प्रति किलोने विकली जाणारी गवारीची भाजी सध्या ६० रुपये प्रति किलो.

* २० रुपये प्रति किलोने विकला जाणारा फ्लॉवर आता ३० रुपये प्रति किलोने विकला जात आहे.

* घेवडय़ाच्या दरात प्रति किलो २० रुपयांनी वाढ झाली असून ६० ते ८० रुपये किलोने विकले जात आहेत.

* त्याचबरोबर टोमॅटो एक आठवडय़ापूर्वी २४ रुपये

प्रति किलोने विकला जात होता, त्यात १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंधन दरवाढीचा परिणाम काहीशा प्रमाणात भाज्यांच्या वाहतुकीवर झाला असून त्यामुळे किरकोळ दरात वाढ झाली आहे. इंधन दरवाढ अशीच होत राहिली तर, भाज्यांचे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

– भगवान तुपे, भाजी विक्रेते, ठाणे</p>