ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सभ्य असते. विरोधी पक्षाने आरोप केल्यास ते कधीही त्यांना वाईट बोलत नाहीत. तर योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसते. त्यांच्याकडे हिमंत आहे. त्यामुळे मला राजकारणामध्ये योगी आणि मोदी आवडतात असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी आनंदोत्सव संगीत समारोहाचे आयोजन डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत, शंभूराज देसाई, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘एकनाथ तू…लोकनाथ तू’ या गाण्याचे अनावरण आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी आशा भोसले यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ऐकण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशा भोसले म्हणाल्या की, मोदी हे पहाटे उठतात. योगा करतात आणि कामाला लागतात. विरोधी पक्षाने आरोप केल्यास त्यांनी कधीही कोणाला वाईट म्हटले नाही. त्यांचे भाषण अगदी सभ्यपणे असते. योगीराज यांच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसते. बाळासाहेब ठाकरे हे देखील माझे आवडते राजकारणी होते. शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांसोबत माझी मैत्री होते असे त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, बाळासाहेबांनी शिवसेना घडवली. तशी एकनाथ शिंदे आता घडवित आहे. एकनाथ शिंदे हिमतीने पुढे आले आणि यशस्वी झाले. माझा त्यांना आशिर्वाद आहे. शिंदे चांगले कर्म करत आहेत. चांगले कर्म करणारे  संपत नाही असेही त्या म्हणाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील मला आवडतात. राज ठाकरे यांचे बोलणे चांगले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे देखील आवडते नेते असल्याचे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी भेटले यासाठी मी नशीबवान असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

गाण्याविषयी त्या म्हणाल्या की, माईक हा माझ्यासाठी देव आहे. मी प्रत्येक गाणे हे पहिले गाणे असल्यासारखे गाते. आयुष्यात भंयकर राजकारण होते.  इंडस्ट्रीमध्ये नवे आलेल्यांना वेगळी वागणूक मिळते. माझ्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. माझ्याविरोधात पुष्कळ लोक उभे राहिले. परंतु काम संपल्यावर मी कोणाशीही न बोलता नघून जायचे असेही त्यांनी सांगितले. मला काम नसेल तर मी जगू शकत नाही. त्यामुळे आजही मी गात आहे असे त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयी देखील त्यांनी मत व्यक्त केले. तंत्रज्ञान हे विष आणि अमृताप्रमाणे आहे. तंत्रज्ञान विचार करण्याची क्षमता घालविणारे आहे. माझ्या आवाजात एआयच्या माध्यमातून गाणी कराल पण गाण्यामधील भावना कुठून आणणार असे त्या म्हणाल्या. सध्याच्या पिढीविषयी त्या म्हणाल्या की, पूर्वीप्रमाणे आता माणूसकी राहिली नाही. आता सर्व विस्कटलेले दिसते.