ठाणे – बुधवारी सायंकाळच्या सुमारास दादरहून अंबरनाथ दिशेने धावणाऱ्या एसी लोकल गाडीमध्ये युनियन कार्ड दाखवून रेल्वे कर्मचाऱ्यांचा विनातिकीट प्रवास सुरू असल्याची व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हारयल होत आहे. या नियमभंगाकडे तिकीट तपासणी कर्माचारी (टीसी) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे, गाडीतून प्रवास करत असलेल्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणले आहे. नियम पाळून तिकीट काढणाऱ्या सामान्य प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही, आणि दुसरीकडे रेल्वे कर्मचारी बिनधास्त एसी डब्यात आरक्षण केल्यासारखे वावरत असल्याने रेल्वे प्रवासी, रेल्वे संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य रेल्वे ही अनेक नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. दिवसाला लाखो प्रवासी रेल्वे गाड्यांनी प्रवास करतात. या रेल्वे गाड्यांमध्ये काही आरक्षित रेल्वे डब्बे असतात. यामध्ये दुप्पट किंमतीचे तिकीट काढून प्रवासी प्रवास करतात. तसेच, मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलगाड्या चालु केल्या आहेत. या लोकल गाडीतून पाचपट किंमतीचे तिकीट काढून प्रवासी प्रवास करतात.
अनेकदा या आरक्षित डब्ब्यांमधून विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून येतात. यांच्यावर तिकीट तपासमी कर्मचाऱ्यांकडून वारंवार कारवाई होत असते. मात्र, बुधवारी सायंकाळी दादरहून अंबरनाथ दिशेकडे धावणाऱ्या एसी लोकल गाडीत रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत विनातिकीट प्रवास करत असल्याचे दिसून आले.
ठाणे – बुधवारी सायंकाळच्या सुमारास दादरहून अंबरनाथ दिशेने धावणाऱ्या एसी लोकल गाडीमध्ये युनियन कार्ड दाखवून रेल्वे कर्मचाऱ्यांचा विनातिकीट प्रवास सुरू असल्याची व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हारयल होत आहे.https://t.co/2jrmCKvB4K#Thane #viralvideo #railway #Local pic.twitter.com/VTgHYFmFG5
— LoksattaLive (@LoksattaLive) May 16, 2025
या गाडीतून एका वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रवास करत होते. त्यांनी कर्मचाऱ्यांचे तिकीट का तपासत नाही असा प्रश्न टिसीला विचारला. या घटनेची व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये नियमितपणे तिकीट काढून प्रवास करतो. पाचपट पैसे देतो, तरीही जागा मिळत नाही. पण काहीजण एनएमआरयुचे (NMRU) कार्ड खिशात ठेवतात आणि टीसी त्यांना विचारतही नाहीत,” अशी भावना या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.
नेमका प्रकार काय ?
बुधवारी संध्याकाळी ५ वाजून १२ मिनीटांची दादरहून अंबरनाथ दिशेकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. एसी लोकल असूनही नेहमीप्रमाणे गर्दी होती. व्हिडिओ करणारा प्रवासी ज्याठिकाणी उभा होता, तिथल्या जागेवर बहुतांश करून रेल्वे कर्मचारी बसले होते. त्यातील एकाच्या खिशात एनएमआरयुचे (NMRU) कार्ड होते. गाडी ठाणे स्टेशन येईपर्यंत चार तिकीट तपासणी कर्मचारी (टीसी) ट्रेनमध्ये आले. त्यांनी प्रवाशांना तिकीट विचारायला सुरूवात केली. प्रवासी आणि त्याच्या बाजुला असलेल्या प्रवाशाने तिकीट दाखवले.
सीटवर बसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टाफ असे सांगितले. तसे तिकीट चेक करणारा टीसी ‘हो गया सबका’ असे म्हणून तिथून जाऊ लागला. तेव्हा व्हिडिओ करणाऱ्या प्रवाशांने टिसीला हटकले. स्टाफ म्हणून तुम्ही त्याचे तिकीट-पास चेक करणार नाहीत का? असा प्रश्न विचारला. टीसी ऐकत नसल्याचे पाहून त्याने व्हिडीओ करायला सुरूवात केली. जर रेल्वे कर्मचाऱ्यांकडे पास आहेत, मग एका कर्मचाऱ्याने खिशात एनएमआरयुचे (NMRU) कार्ड कशासाठी ठेवल आहे ? असा जाब प्रवाशाने टीसीला विचारला.
त्यावर एका टीसीने लागलीच त्या प्रवाशाला सीटवरुन उठवले. तर दुसरा टीसी प्रवाशाशी हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. त्याने एका रेल्वे प्रवाशाचा ग्रीन पास प्रवाशासमोर धरून, आम्ही कसे प्रत्येकाचे पास तपासत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या रेल्वे कर्मचाऱ्याकडे एसी लोकल गाडीचे तिकीट नव्हते. त्याच्यावर कारवाई करा, असे सांगूनही टीसी ऐकायला तयार नसल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. संबंधित प्रवाशाने व्हिडीओ करत याचा पुरावा सादर केला असून, “कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा,” अशी ठाम भूमिका घेतली.
या घटनेविषयी पुर्ण माहिती नसल्याने आणि असा प्रकार घडत आहे की नाही याबाबत माहिती नसल्याने मध्य रेल्वेने प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.