नागरिकांकडून प्रतिसाद नाही; पालिकेची तयारी पुन्हा वाया

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा पालिकेचा प्रयत्न यंदाही फसला आहे. नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने या वर्षीही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची योजना रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदाही तलावात आणि समुद्रात पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन होणार आहे. कृत्रिम तलाव रद्द झाल्याने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी छोटय़ा मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

‘हरित वसई, स्वच्छ वसई’ असा नारा देणाऱ्या वसई-विरार महापालिकेला यंदाही पर्यावरणच्या संवर्धनासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारता आलेले नाहीत. नागरिकांची उदासीनता, कृत्रिम तलावांबाबत जनजागृती करण्यात आलेले अपयश यामुळे यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी नवीन आलेले पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी कृत्रिम तलाव बनवण्याचा संकल्प जाहीर केला होता. प्रत्येक प्रभागात कुठे कृत्रिम तलाव उभारले जातील, त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते, परंतु त्या वेळी शहरातील लोकांची मानसिकता तयार झालेली नव्हती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर करा, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी वेळ कमी पडेल, असे लक्षात आल्यानंतर तेव्हा ही योजना बारगळली होती.

पुढच्या वर्षी नीट तयारी करून, लोकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम तलाव उभारले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यंदाही मागचा कित्ता गिरवण्यात आला आहे. कृत्रिम तलावांचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात पालिका अपयशी ठरली आहे. पालिका आयुक्त आणि महापौरांनी गणेशोत्सव मंडळाच्या पूर्वतयारीसाठी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या होत्या, परंतु अनेक नगरसेवकांनी त्याला नकार दिल्याचे समजते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनीही कृत्रिम तलावाला विरोध केला. त्यामुळे कृत्रिम तलावाची योजना बारगळली आहे.

पर्यावरणप्रेमींची नाराजी

पर्यावरणाबाबत सजग असणाऱ्या भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेकडे तब्बल एक वर्षांचा कालावधी होता. मग कृत्रिम तलावाबाबत नियोजन आणि जनजागृती का केली नाही, असे वसईतील पर्यावरणप्रेमी अविनाश कुसे यांनी सांगितले. शहरात अस्तित्वात असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते आणि आम्हाला नाइलाजाने त्यातच विसर्जन करावे लागते. कृत्रिम तलाव असते तर तलावांचे प्रदूषण थांबले असते, असे त्यांनी सांगितले.

लहान मूर्ती ठेवण्याचे महापौरांचे आवाहन

महापौर प्रवीणा ठाकूर या पर्यावरणाला प्राधान्य देतात. प्रत्येक योजनेत पर्यावरणाचे जतन व्हावे, हा त्यांचा आग्रह असतो. कृत्रिम तलावाची योजना बारगळल्याने त्यांनी नागरिकांना छोटय़ा मूर्ती बसविण्याचे आवाहन केले आहे. गणेश मंडळांनाही मोठय़ा मूर्तीची स्पर्धा करू नये, असे आवाहन केले आहे. छोटय़ा मूर्तीमुळे तलावांचे प्रदूषण कमी होईल. त्यामुळे त्यांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. विरार पोलिसांनी तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी यापूर्वीच नागरिकांना मूर्ती विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन केले आहे. दान केलेल्या मूर्तीचे नंतर समुद्रात विसर्जन केले जाईल, असा हा प्रयत्न असेल.

आम्ही मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही तयारी केली होती. कृत्रिम तलाव कसे असतात, ही योजना कशी राबवायची त्याचा पूर्ण अभ्यास करण्यात आला, पण अद्याप लोकांची मानसिकता तयार झालेली नाही. त्यामुळे आता जर कृत्रिम तलाव उभारले, तर कोटय़वधी रुपये वाया जातील म्हणून यंदा आम्ही कृत्रिम तलावाचा प्रयोग राबवणार नाही.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, महापालिका