ठाणे : भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहीनी मंगळवारी रात्री फुटली असून तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते. यामुळे भिवंडी शहरातील पाणी पुरवठ्यावर बुधवारी परिणाम झाला असून काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार घडल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले.

भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन स्त्रोतांमार्फत दररोज १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून ७३ दशलक्षलीटर, मुंबई महापालिकेडून ४२ दशलक्षलीटर आणि वऱ्हाळदेवी तलाव पाणी योजनेतून ५ दशलक्षलीटर इतके पाणी पुरवठा करण्यात येतो. हे तिन्ही स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचे मानले जातात. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम प्राधिकरणाची ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहीनी मंगळवारी रात्री फेने गावात फुटली. तिच्या दुरुस्तीचे काम पालिकेने तातडीने हाती घेतले. बुधवारी दिवसभर हे काम सुरू होते. यामुळे कामतघर, नारपोली, साठे नगर, ओसवालवाडी, रेल्वे स्टेशन रोड, ताडाली, भाग्यनगर, विनायक नगर, चंदन बाग आणि देवजी नगर या भागांचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेम प्राधिकरणाची फुटलेली जलवाहीनी दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मात्र, दुरुस्तीनंतर शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. यामुळे शहरातील कल्याण रोड, गुलजार नगर, चव्हाण कॉलनी, बाला कंपाऊंड, खंडू पाडा, निजामपुरा, वंजारपट्टी नाका, कोंबडपाडा, नजराणा कंपाऊंड, गोपाल नगर, गोकुळ नगर, मिल्लत नगर, अवचित पाडा, आमपाडा, म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरामध्ये स्टेम कडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे. जलवाहीनी दुरुस्तीचे काम महानगरपालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले असून बुधवार मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.