डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल. उमेदवारीवरून कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, असा कोणताही निर्णय भाजपा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार नाही, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथील ब्राह्मण सभेत भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

भिवंडी लोकसभेचा शनिवारचा दौरा आटोपून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रविवारी सकाळी महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी डोंबिवलीत दाखल झाले. ब्राह्मण सभेत बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा हद्दीतील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याठिकाणी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. फक्त भाजपा पक्ष पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या या बैठकीत डोंबिवलीतील भाजपाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेसाठी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात नसलेला उमेदवार येथे लादण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यामुळे पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात असलेला उमेदवार कल्याण लोकसभेत उमेदवार म्हणून देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा कार्यकर्ते नाराज होतील, असा सूचक इशारा दिला, अशी माहिती बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली.

हेही वाचा – ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांकडून तटकरे यांना काळे झेंडे

मंत्री चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच कल्याण लोकसभेसाठी योग्य उमेदवार निश्चित केला जाईल, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. बावनकुळे यांनी संकल्प यात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीतील एक हजाराहून अधिक नागरिकांशी रविवारी संवाद साधला.

शिवसेनेकडून स्वागत

शिवसेना शाखेसमोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. सभेच्या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याने पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

हेही वाचा – मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला धनगर समाजाचा पाठिंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीत बावनकुळे येणार असल्याने महापालिकेने येथील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली, मानपाडा रस्ता भागात दुतर्फा बसणारे फेरीवाले शनिवारी रात्रीपासून हटविले होते. या भागातील फेरीवाले कायमचे हटवावे यासाठी नागरिक दररोज पालिका आयुक्त, उपायुक्त, फ प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र भाजपाचा एक नेता येणार म्हणून पालिकेने फेरीवाल्यांना रविवारी अर्धा दिवसासाठी हटविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.