ठाणे : घोडबंदर भागात एका भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. स्वाती कदम (४०) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती या आठ दिवसांपूर्वीच येथील केशकर्तनालयात कामासाठी रुजू झाल्या होत्या. कामावरुन घरी परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरातील एका केशकर्तनालयात स्वाती कदम या काम करत होत्या. रविवारी केशकर्तनालयात गर्दी होती. रात्री उशीर झाल्याने केशकर्तनालयाचे मालक मनोज ठाकूर यांनी स्वाती यांना दुचाकीने घरी सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही दुचाकीने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होते. त्याचवेळी एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मनोज आणि स्वाती हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले.

मनोज यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर स्वाती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहन चालकाने तेथून पळ काढला. घटनेनंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु स्वाती यांना डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.