शहापूर : येथे घरात भांडी घासत असताना एका महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनंदा मधुकर पडवळ असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे शहापूरात शोककळा पसरली आहे. शहापूरात गेल्याकाही दिवसांत वीज पडून मृत्यू झाल्याची ही चौथी घटना आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहापूरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. सोमवारी दुपारी चोंढे येथील ५१ वर्षीय सुनंदा पडवळ या राहत्या घरात भांडी घासत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत शहापूरात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी तालुक्यातील जांभूळवाड येथील दिनेश सोगिर, भगवान सोगिर व कोळीपाडा येथील शिडू मेंगाळ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
तालुक्यात सोमवारी विद्युत तार पडल्याने विजेच्या झटक्याने एक म्हशीचा मृत्यू झाला आहे. तर, चिखलगाव येथील कैलास देसले व खुटघर येथील हरिश्चंद्र शिंदे यांचे पडवी घर कोसळले.