ठाणे : सोन्याचे दागिने घालून तुम्ही कुठेही जात असाल तर सावध राहा. आता चोरट्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने खेचून ठाणे रेल्वे स्थानकात पळ काढला. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
गेल्याकाही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. सोने एक लाखाच्या आसपास असल्याने आता दागिने खरेदी करताना नागरिकांच्या तोंडाला फेस येत आहे. सोन्याचे दागिने घेताना एकेकाळी महिला दिलखुलासपणे खरेदी करत होत्या. परंतु आता प्रतितोळा एक लाख रुपयांच्या आसपास दागिन्यांची किंमत झाल्याने महिला देखील दागिने खरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. त्यात सोन्याची चोरी झाली किंवा सोने गहाळ झाल्यास जिव्हारी लागत आहे.
दागिने महाग, चोरट्यांचा सुळसुळाट
सोन्याचे दागिने महाग झाले असताना दुसरीकडे चोरट्यांचा देखील सुळसुळाट वाढू लागला आहे. ५२ वर्षीय महिला मुंबईतील भांडुप येथे राहत असून त्यांचा किरकोळ दरात फुले विक्रीचा व्यवसाय आहे. त्या नेहमी दादर येथे जाऊन घाऊक दरात फुले खरेदी करुन फुलांची आणि इतर साहित्यांची विक्री करतात. शुक्रवारी गोकुळाष्टमी असल्याने त्यांनी ठाणे शहरातून फुले आणि इतर साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या गळ्यामध्ये नेहमी ५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी घालतात. ठाणे येथील बाजारपेठेतून त्यांनी फुले, काकडी, केळीची पाने, आळूची पाने विकत घेतली. त्यानंतर त्या पुन्हा ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी जात होत्या. त्यांच्या दोन्ही हातामध्ये सामानाच्या पिशव्या होत्या. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पदपथावरून चालत असताना, अचानक त्यांच्या मागून एक व्यक्ती आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर स्थानक परिसरातील रिक्षा चालक आणि इतर प्रवासी त्या चोरट्याच्या मागे पळू लागले. परंतु तो चोरटा ठाणे रेल्वे स्थानकात शिरल्याने तो चोरटा दिसेनासा झाला.
घटनेनंतर महिलेने तात्काळ ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणे नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.