ठाणे : स्त्रियांना अजूनही योग्य तो मान मिळत नाही. कुठल्याही क्षेत्रातील पुरस्कार असो किंवा समित्यांमध्ये नावांची निवड असो, निवड केलेल्या पाच-सहा नावांमध्ये निम्मी संख्या स्त्रियांची असायला हवी. परंतू, पात्र असतानाही स्त्रियांना मुद्दाम डावलले जाते, अशी खंत ज्येष्ठ लेखिका सानिया यांनी शनिवारी ठाण्यातील महिला साहित्य संमेलनात बोलताना व्यक्त केली.
ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद या संस्थेचे महिला साहित्य संमेलन पार पडले. हे संमेलन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या शारदा साठे, प्रा. वृषाली मगदूम आणि डॉ. प्रज्ञा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ लेखिका सानिया यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
“आजचा स्त्रीवाद मुद्दाम रचलेल्या ढोंगी चौकटीत अडकलेला दिसतो. म्हणूनच ज्यांना विचार करावासा वाटतो, विवेकबुद्धी वाढीला लावाविशी वाटते, त्यांनी स्त्रीवाद नक्की काय आहे, याचा अभ्यास, चिंतन आणि सखोल समज करून घेणे आवश्यक आहे, असे लेखिका सानिया म्हणाल्या. स्त्रीवाद हा कोणताही अवघड पंथ नसून, तो प्रत्येकाच्या विचारात आणि आचारात सहज सामावणारा दृष्टीकोन आहे. सजग माणूस स्वाभाविकपणे स्त्रीवादी असतो आणि असायलाच हवा. शेवटी आपण कोण व्हायचे हे ठरवणे आपल्या विचारांवर अवलंबून असते, आणि हाच स्त्रीचळवळीचा तसेच स्त्रीवादाचा मूलभूत गाभा आहे, असे त्यांनी सांगितले.
ललित साहित्य कुठल्याही सामाजिक हेतूने लिहिलेले नसते, त्यामुळे समाजाला काही सांगण्याचा आव साहित्यिक आणत नाही. ते केवळ भावानुभव देतात. त्यातून आपल्याला जगण्याबद्दल अधिक जाण येते, एक प्रगल्भ दृष्टी आपोआप मिळते. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरे सापडू शकतात, निदान त्यांचे आकलन होते आणि जगण्याला एक दिशा मिळू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
केवळ महिलांची दु:ख रंगवली म्हणून स्त्रीवाद प्रकट होतो, असे नाही. त्यांच्या आयुष्यातील संकट किंवा झालेला अन्याय साहित्यात मांडला म्हणूनच साहित्यिकांना स्त्रीवर्गाबद्दल आस्था आहे किंवा त्यांना खरोखर स्त्री चळवळीचे भान आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे देखील त्या म्हणाल्या.
माझ्या दुःखाची जात वेगळी – कवयित्री उषाकिरण आत्रम
माझे दुखणे वेगळे आहे, कारण माझ्या दुःखाची जात वेगळी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून इतके वर्षे झाली. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही प्रतिज्ञा आपण दररोज म्हणतो, यावर पुस्तके लिहितो. परंतू, अजूनही स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबलेले नाहीत, अशी खंत कवयित्री उषाकिरण आत्रम यांनी महिला संमेलनात बोलताना व्यक्त केली. आपण शहरामध्ये राहतो, पुस्तकी ज्ञान घेतो, ग्रंथ वाचतो आणि लिहितो. परंतू, तळागाळातील ज्या महिला आहेत, त्यांचे शोषण त्यांच्यावरचे अत्याचार अजूनही थांबलेले नाही. हे पाहूनच मला अस्वस्थ वाटते, असे त्या म्हणाल्या.
परिसंवादात महिला अत्याचारावर भाष्य
मध्यमवर्गीय स्त्रिया अजूनही सोसण्याच्या कविता लिहित आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला आवडणारे हे लिखाण आता मोडायला हवे. स्त्रियांनी आपल्या स्थानाबद्दल, प्रवासाबद्दल आणि इच्छांबद्दल प्रांजळपणे व्यक्त व्हायला हवे. स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत असताना स्त्री लेखकांनी आपली कक्षा ओलांडून पुढे जाणे आवश्यक आहे, असे कवयित्री नीरजा यांनी म्हटले.
दलित स्त्रियांना दुहेरी शोषणाला सामोरे जावे लागते. दलित असल्यामुळे पुरूषांना अस्पृश्यतेचे चटके बसतात, जबरदस्ती कामे करावी लागतात. तर स्त्री असल्यामुळे अत्याचार, बलात्कार आणि उपभोगाची वस्तू म्हणून त्यांचा वापर होतो. तसेच परिवर्तन घडवण्यासाठी संविधानिक मूल्ये जगण्याचा भाग बनवणे आवश्यक असल्याचे डॉ. अश्विनी तोरणे यांनी सांगितले.
एकूण साहित्यात मुस्लिम स्त्रियांचे चित्रण पीडित दिसते. मुस्लिम मराठी साहित्य लिहिणाऱ्या स्त्रिया कमी आहेत. माध्यम आणि सिनेमा मधून मुस्लिम पुरुषांचे वर्णन विद्रूप केले आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची मर्यादा यायला लागली आहे, असे लेखिका हिनाकौसर खान यांनी सांगितले.