कल्याण – कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या बाजुला असलेल्या हिंद ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावरील ५९ हजार रूपयांची ग्राहक सेवेतून जमा झालेली रक्कम याच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कामगारानेच चोरून नेली आहे, अशी तक्रार पेट्रोलपंप व्यवस्थापकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. हा कामगार उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. कल्याण पश्चिमेत के. सी. गांधी शाळेच्या बाजुला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा हिंद ऑटोमोबाईल नावाने पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर अमन कुमार तिवारी (२०) हा तरूण ग्राहक सेवेसाठी कार्यरत होता. तो दैनंदिन ग्राहक सेवेचा काम व्यवस्थित करत असल्याने पेट्रोल पंप चालकाने त्याच्यावर विश्वास ठेवला होता.

गेल्या आठवड्यात हिंद ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकीवर तो ग्राहक सेवेसाठी तैनात होता. त्याला कंपनीकडून ग्राहक सेवेसाठी एक मोबाईल देण्यात आला होता. त्याचा वापर तो करत होता. तैनात असताना ग्राहकांच्या वाहनात पेट्रोल टाकल्यानंतर कामगार अमन कुमार तिवारी याच्याकडे ५९ हजार रूपयांची रक्कम जमा झाली होती. अशाप्रकारे रक्कम जमा झाली ती रक्कम पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाकडे तो नियमित भरणा करत होता.

गेल्या आठवड्यात त्याच्याजवळ ५९ हजाराची रक्कम जमा झाली असताना अमन तिवारी याने जवळील रक्कम पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकडे भरणा केली नाही. तो काही वेळाने रक्कम भरणा करील असे व्यवस्थापकाला वाटले. जमा झालेली रक्कम घेऊन काही कारण देऊन अमन पेट्रोल पंपाच्या बाहेर गेला. तो परत येईल असे पेट्रोल पंप चालकाला वाटले. खूप उशीर झाला तरी अमन तिवारी परत आला नाही. म्हणून पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक आणि इतर कामगारांनी त्याचा परिसरात शोध घेतला तो आढळून आला नाही. त्याच्या जवळील कंपनीचा फोन बंद लागत होता. त्यामुळे त्याने ही रक्कम चोरीच्या उद्देशाने लबाडीने चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करत हिंंद पेट्रोलपंंपावरील व्यवस्थापक संतोष रमाकांत सिंह यांनी या चोरीप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमन तिवारी हा मुळचा उत्तरप्रदेशातील अलहाबाद जिल्ह्यातील खाप्तीहान गावचा रहिवासी आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. एस. भालेराव यांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हिंद पेट्रोलपंप हा कल्याण मधील सर्वाधिक ग्राहक वर्दळीचा पेट्रोलपंंप आहे.