कल्याण – कल्याणमध्ये राहत असलेला एका पत्रकार शुक्रवारी दुपारच्या वेळेत डोंबिवलीतून ९० फुटी रस्त्याने पत्रीपुलाजवळून दुचाकीवरून घरी चालला होता. यावेळी पत्रीपुलाजवळ समोरून एक दुचाकी स्वार विरूध्द मार्गिकेतून सुसाट वेगाने येऊन त्याने पत्रकाराच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तरूणांनी पत्रकाराला घेरून तुझ्यामुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले. हा अपघात झाला, अशी कारणे देत पत्रकारावर दबाव निर्माण करून १० हजार रूपयांची खंडणी मागितली.

पत्रकाराने याप्रकरणी पोलिसांना कळविताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी पत्रकाराच्या तक्रारीवरून खंडणी मागणाऱ्या कचोरे गावातील हनुमाननगर भागातील तीन तरूणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस येण्यापूर्वीच एक तरूण घटनास्थळावरून पळून गेला.

स्वप्निल शेजवळ असे तक्रार दाखल करणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी दुपारी ते डोंबिवलीत वृ्त संकलनाच्या कामासाठी आले होते. कामे झाल्यानंतर ते ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याने पत्रीपुलावरून कल्याणमध्ये घरी चालले होते.

पत्रीपुलाजवळ काँग्रेसचे पदाधिकारी शकील शेख यांच्या कार्यालया समोरून जात असताना अचानक पत्रकार शेजवळ यांच्या समोरून विरूध्द मार्गिकेतून एक तरूण दुचाकीवरून सुसाट वेगाने आला. त्याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून पत्रकार शेजवळ यांंच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत पत्रकार शेजवळ जमिनीवर पडले. त्यानंतर समोरील दुचाकीवरील एका तरूणाने पत्रकार स्वप्निल शेजवळ यांना छत्री आणि हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. आपल्यामुळे आमचे नुकसान झाले असे बोलत भरपाई म्हणून तात्काळ १० हजार रूपयांची मागणी दुचाकीवरील दोन्ही तरूण करू लागले. शेजवळ या तरूणांना रोखत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

शेजवळ यांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला. पोलीस आल्यावर आपण न्यायनिवाडा करून असे सांगूनही समोरील तरूण ऐकत नव्हते. ते पत्रकार शेजवळ यांना धमकी, दमदाटी, अरेरावी करून तात्काळ दहा हजार रूपये देण्याची मागणी करत होते. भरपाई दिल्या शिवाय येथून जायचे नाही अशी तंबी देत तरूणांनी शेजवळ यांना घेरले होते. पोलीस आता येत आहेत असे शेजवळ बोलताच एक जण घटनास्थळावरून निघून गेला. अन्य एक तरूण तेथे दाखल झाला. तोही या तरूणांंमध्ये सामील होऊन दहा हजारांची भरपाई देण्याची मागणी करू लागला. त्याशिवाय येथून तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भाषा करत होता.

दरम्यान दोन पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी उपस्थित तरणांना ताब्यात घेतले. स्वप्निल शेजवळ यांच्या तक्रारीवरून पत्रीपुलाजवळील कचोरे गावातील राधाकृष्ण मंदिराजवळील हनुमान नगरमधील मयूर दीपक बिराजदार, सोनु ओमप्रकाश राजभर, मयुरच्या लहान भावाचा मित्र यांच्या विरुध्द मारहाण आणि खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

काही महिन्यापूर्वी डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावर चार पत्रकारांना मारहाण करणाऱ्या महात्मा फुले रस्ता भागातील भाईंची पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खोड मोडली होती. त्यानंतर हा भाई नंतर थंडावला असल्याची चर्चा आहे.