ठाणे : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाण्यात युवक काँग्रेसतर्फे हातात मेणबत्ती घेऊन निषेध आंदोलन करण्यात आले. ठाणे तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी आशिष गिरी म्हणाले, डॉ. संपदा मुंडे या फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांच्यावर एका उपनिरीक्षकाकडून अलैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या अन्यायामुळे त्यांनी आत्महत्या केली, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशा प्रकरणांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.”

गिरी पुढे म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदाचा एवढा मोह का? राज्यात दिवसाढवळ्या गुन्हे घडत आहेत, महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, तरीही सरकारकडून ठोस कारवाई होत नाही. आज आमची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की, जे आरोपी आहेत त्यांच्यावर निष्पक्ष कारवाई व्हावी. कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळायला हवा.

नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जर जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तसेच दुसरा गृहमंत्री करावा जे खात्यामध्ये २४ तास कार्यरत राहू शकतील. जर फडणवीस यांनी राजीनामा नाही दिला किंवा त्या महिलेला न्याय नाही मिळाला. तर श्रीलंका आणि नेपाळप्रमाणे आता भारतातही लोकांचा संयम सुटेल. कारण जनता ही त्रासलेली आहे. त्यामुळे अशी घटना भारतामध्ये देखील होईल असा इशाराही त्यांनी दिला.

नेमके प्रकरण काय?

फलटण तालुक्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. ही महिला डॉक्टर सरकारी रुग्णालयात कार्यरत होती. प्राथमिक माहितीनुसार, तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट लिहून ठेवली असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये तिने आपल्यावर झालेल्या अन्याय आणि मानसिक त्रासाबद्दल उल्लेख केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींची नावे समोर आली असून ते दोघेही पोलिसांना शरण आले आहेत.