डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावर दुचाकीवरून जात असलेल्या एका तरूणाच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या अवजड कंटेनर चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू झाला. या मृत्यु प्रकरणी मयत तरूणाच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अंकित मनोजकुमार शुक्ला (२४) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसमवेत कोळेगाव येथे राहत होता. मयत अंकित शुक्ला दुचाकीवरून रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान कल्याण शिळफाटा रस्त्यावरून चालले होते. या रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक होती. यावेळी अंकित शुक्ला यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या कंटनेर चालकाने निष्काळजीपणाने, भरधाव वेगात, हलगर्जीपणा करत कंटेनर चालवून दुचाकीस्वार अंकितला जोराची ठोकर दिली. या ठोकरीत अंकित दुचाकीसह रस्त्यावर पडला. आणि त्याच्या अंगावरून कंटेनर गेला. कंटेनरची चाके डोक्यावरून गेल्याने अंकितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हा अपघात घडल्यानंतर भरधाव वेगात असलेला कंटेनर चालक पळून जाऊ नये म्हणून इतर वाहन चालकांनी कंटेनर चालकाला रोखून धरले. त्याला कंटेनर बाजुला घेण्यास सांगण्यात आले. मयत अंकित जवळ त्याच्या घरच्या पत्त्याचा, मोबाईलचा काही पुरावा आहे का म्हणून काही वाहन चालकांनी तपासले. मिळालेल्या माहितीवरून अंकित कोळगाव भागातील रहिवासी असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ मानपाडा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गंभीर जखमी अंकित शुक्ला याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी आवश्यक उपचार केले. पण डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने डाॅक्टरांनी अंकितला मृत घोषित केले. शिवम मनोजकुमार शुक्ला या अंकितच्या मोठ्या भावाने मानपाडा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी कंटेनर चालका विरुध्द तक्रार केली आहे.
पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे याप्रकरणाचा तपास करत आहेत. अपघात घडला त्या दिवशी रस्ता मोकळा होता. वाहतूक कोंडी नव्हती. तरीही हा अपघात झाल्याने पोलीस आश्चर्य व्यक्त करत आहेत.
अपघात घडला त्यावेळी वाहन चालकाने मद्य सेवन केले होते का. त्याच्या ताब्यातील कंटेनरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. कंटेनर चालकाला वाहनावरील अचानक ताबा सुटल्याने त्याला डुलकी लागली होती का, अशा अनेक माध्यमातून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
