27 October 2020

News Flash

कसा होतास तू ..

‘‘अगं, किरण आला होता.. तू अनूसोबत हॉस्पिटलमध्ये आहेस कळल्यावर म्हणाला

‘‘अगं, किरण आला होता.. तू अनूसोबत हॉस्पिटलमध्ये आहेस कळल्यावर म्हणाला, ‘काय आत्या.. फीडिंगचाच प्रॉब्लेम झालेला ना. मला किंवा पल्लवीला सांगायचं ना. आम्ही शिकवलं असतं तिला! पल्लवीला पण नीलयच्या वेळी जरा वेळ लागला होता सेटल व्हायला. कॉमन आहे गं.’ त्याचं ऐकून मी अचंब्यातच पडले. तुमची पिढी खरंच बदलली आहे. पुढारली आहे. आमच्या काळी तर नवऱ्यांना बायकांचं बाळंतपण कसं झालं, बाळ कधी मोठं झालं काहीच माहीत नसायचं. नुसती नोकरी करायची आणि घरी पैसे द्यायचे. तुमच्या पिढीतले वडील आईच्या इतकेच बाळ सांभाळण्यात तरबेज आहेत. आमच्या काळी तर पाजताना बाई कुणाला दिसता कामा नये अशी सक्ती होती; पुरुषांना यातलं कळणं म्हणजे आणखीनच दूर. काळ बदलला खरंच..’’ आई माझ्याशी कमी आणि स्वत:शीच जास्त बोलत होती. ज्या मुलांना, भाचरंडांना तिने लहानाचं मोठं होताना पाहिलं ते असे इतके मोठे कधी झाले, याचा थांगपत्ताच तिला लागेना.

खरं तर मलाही थोडं आश्चर्यच वाटलं होतं हे ऐकून. किरणदादा माझा मामेभाऊ. अभ्यासात प्रचंड हुशार, पुस्तकी किडा. १०वी, १२वीत मेरिटमध्ये आलेला. व्हीजेटीआयसारख्या कॉलेजमध्ये शिकलेला. कॅम्पस प्लेसमेंटमधून थेट ब्रिटानियासारख्या कंपनीत लागलेला. तो जो फार कधी कुणाशी बोलत नसे. नोकरीनिमित्त भारतभर आणि नंतर यूकेमध्ये बरीच वर्ष राहिलेला तो. तो इतका बदलला, इतका समंजस, इतका काळजीवाहू झाला की मला, त्याच्या बहिणीला दूध पाजताना थोडय़ा अडचणी आल्यामुळे नि बाळाला हवं तितकं दूध न मिळाल्यामुळे, बाळ अशक्त झालं. नवख्या आईला आणि नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला लागले. तर त्याचा जीव कासावीस झाला आणि थेट भेटायलाच आला ही केवढी मोठी गोष्ट आहे! जरी त्याच्या शिकवण्याची प्रत्यक्षात वेळ आली नाही तरी त्याच्या मनातला कळवळा मला किती धीर देऊन गेला. भावांनी पाठराखण कशी करायची, बहिणींची काळजी कशी घ्यायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. असं नाही की आमच्या आधीच्या पिढीतल्या भावांनी बहिणींची काळजी नाही केली, माया नाही दिली. पण बदलत्या काळानुरूप नात्यात हे असे गरजेचे बदल येत गेले आणि ती खरी जमेची बाजू आहे.

तो एकटाच नाहीये बदललेला. हा बदल आजकाल आपण सगळीकडेच पाहतोय. मुलांना अंघोळ घालण्यापासून शाळेत सोडण्यापर्यंत, मुलींच्या वेण्या घालण्यापर्यंत बरीचशी कामं त्यांचे बाबा करतात. वडील आणि मुलांमध्ये पूर्वीच्या काळी जे एक अंतर पाहायला मिळायचं ते आजकाल दिसेनासं होऊ लागलंय. आपली बदलती जीवनशैली, स्त्रियांचं नोकरीनिमित्त बाहेर पडणं आणि शिक्षणातून, अनुभवातून आलेलं शहाणपण यामुळे आता बॉल पुरुषांच्या कोर्टात गेलाय आणि ते मस्त गेम खेळतायत. माझ्या नशिबाने माझ्या आजूबाजूला जितके पुरुष आहेत त्यातले जवळजवळ सगळेच पुरोगामी आहेत. माझ्या प्रसूतीच्या वेळी माझा नवरा ऑपरेशन थिएटरच्या आत माझ्यासोबत होता. मला येणाऱ्या कळा माझ्यासोबत अनुभवत होता. माझ्या पिल्लाला जेव्हा ट्रेमध्ये ठेवून बाहेर घेऊन गेले, तेव्हा त्याने बाळाला एक क्षण पाहिलं आणि आधी डॉक्टरांना विचारलं, ‘‘ती ठीके ना?’’ माझ्या आईसाठी ती खूपच मोठी गोष्ट होती. त्यांच्या पिढीला असा अनुभव नव्हता असं नाही, पण असं प्रसूतिगृहात बायकोसोबत डॉक्टर सांगेपर्यंत थांबणं, पूर्ण वेळ बायकोची काळजी करणं हे सगळं खूप नवीन होतं तिच्यासाठी.

माझा नवरा मी घेते तितकीच काळजी माझ्या मुलाची आणि घराची घेतो, कधी कधी तर माझ्याहून अधिक. मला नोकरीनिमित्त परदेशी जायची संधी मिळाली तेव्हा मला पहिल्या खेपेत होकार देणारा तोच. आश्चर्य म्हणजे, त्याचं कारण एकदम सोपं होतं! ‘‘माझ्यावर परदेशी जायची वेळ येते तेव्हा मी जातोच ना. तू सांभाळतेस ना त्याला. मग तू गेलीस की मी सांभाळेन! त्यात काय एवढं?’’ मी नोकरीत घेतलेल्या ब्रेकनंतर जेव्हा पुन्हा नोकरी करू लागले तेव्हापासून तर आमच्या मुलाची सगळीच जबाबदारी त्याने घेतली. माझ्या मुलाला शेवटची अंघोळ मी कधी घातलीये मला आठवतही नाही. आता तोच मला म्हणतो, ‘‘आई, तू नको; बाबांना अंघोळ घालू दे. तू जाम फास्ट फास्ट अंघोळ घालतेस. बाबांचे हात मऊ  लागतात.’’  माझा भाऊही तसाच. वहिनी नोकरी करू लागल्यावर त्याने मुलाला न्हाऊमाखू घालण्यापासून पाळणाघरात सोडायची जबाबदारी स्वत:वर घेतली. इतर भावंडेही अशीच. हे सामंजस्य केवळ जोडीदारासोबत असलेल्या निरोगी नात्यामुळे नाही, तर शिक्षणामुळेही आहे. आपल्या समाजात समानता फारशी दिसत नसली तरी तिची बीजे रोवली जात आहेत आणि ते शिक्षणामुळे. मूल्य शिक्षणाचे वर्ग तेव्हा कंटाळवाणे वाटले असले तरी त्यातला अर्थ छान रुजलाय आमच्या पिढीत.

घरातच नाही तर कामाच्या ठिकाणीही समानता जोपासणारे लोक भेटलेत मला. एकदा एका प्रोजेक्टच्या डिलिव्हरीसाठी शनिवारी ऑफिसला जावं लागलं. एका सहकाऱ्याची बायको त्याच्या लेकीला ऑफिसमध्ये सोडून गेली. तिचं काम आटपेपर्यंत चारेक तास लागणार होते. मला त्याची इतकी कमाल वाटली! तो शुक्रवारपासून ऑफिसमध्ये होता, लेक कुणाकडेच जायला तयार नव्हती, तरी तो शांतपणे आपलं काम करता करता तिला सांभाळत होता. तो एक चित्र काढून द्यायचा. मग ती छोटुली ताई ते चित्र रंगवायची. मग ती बाबाला विचारायची, ‘‘हे बरोबर आहे का?’’ मग तो शांतपणे ‘‘हो’’ म्हणायचा. मग ती त्याला दुसरं चित्र काढायला सांगायची. हा सिलसिला सकाळी ११.३० पासून दुपारी ४.३० पर्यंत सुरू होता आणि त्या सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर कंटाळ्याची एक रेष दिसत नव्हती! मला तर वाटलं त्याला विचारावं, ‘‘क्लास घेशील का आमचे? सबुरी क्लासेस!’’

काही दिवसांपूर्वी जुन्या ऑफिसच्या एका सहकाऱ्याचा फोन आला होता. ऑफिसमध्ये काय गोंधळ सुरू आहे ते सांगत होता. मी सहज सल्ला द्यायचा म्हणून बोलून गेले, ‘‘अरे, दुसरीकडे नोकरी शोध ना. त्यात काय एवढं. हुशार आहेस, कर्तबगार आहेस, मेहनती आहेस. अशा लोकांचीच तर गरज असते सगळीकडे.’’ त्याच्या उत्तराने मी उडालेच! म्हणाला, ‘‘नाही गं. ही नोकरी सोडण्यात थोडी रिस्क आहे. माझ्या लेकीची शाळा ऑफिसपासून जवळच आहे. मीच तिला आणतो सोडतो. बायकोचं ऑफिस घरापासून लांब आहे. आमची सगळी सेटिंग बिघडेल. बायकोला नोकरी सोडायला सांगावं लागेल. मुलीची शाळा बदलावी लागेल. सगळीच गडबड होईल.’’ आत्ता-आत्तापर्यंत हे असलं काहीतरी ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये ऐकायला मिळत असे. पण एका पुरुषाने असं म्हणणं, बायको-मुलीची सोय बघणं, त्यासाठी असा विचार करणं हेच केवढं तरी मोठंय.

हा बदल नुसता आमच्याच पिढीतला नाही तर तो आमच्या आधीच्या पिढीतही काही प्रमाणात दिसतो. कदाचित उशिरा आलेलं शहाणपण असेल पण ते आहे. सुदैवाने मला भेटलेली अशीच एक व्यक्ती म्हणजे माझे सासरे. सासूबाईंची तब्येत बिघडली आणि मुलांची ओढाताण होऊ लागली हे पाहताच त्यांनी आपली नोकरी सोडली. आपल्या बायकोइतक्याच सफाईने संसार चालू ठेवला. तिची शुश्रूषा केली. सासूबाईंची तब्येत आता खूप बरी आहे. औषधोपचार आणि इतर उपायांपेक्षा आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी असा निर्णय घेतला या विचाराने त्यांना जास्त सुखावह वाटलं असेल.

माझ्या सासू-सासऱ्यांच्या नात्यात इतकी मजा आहे त्याचं कारण त्यांनी एकमेकांना आहे तसं स्वीकारलंय. एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासल्या आहेत. आमच्या घरातला एक फेमस किस्सा इथे नमूद करते. सचिनची शेवटची मॅच होती आणि आमच्या सासूबाई त्याच्या फार मोठय़ा फॅन. मॅच संपल्यावर सचिन निरोप घेताना काहीतरी बोलणार, ते ऐकण्यासाठी त्या अगदी कानात प्राण आणून टीव्हीसमोर बसलेल्या. सगळा कार्यक्रम संपला तेव्हाच त्या जागच्या उठल्या. मी ऑफिसहून बरोबर वेळेत फोन करून त्यांना विचारलं, ‘‘केलंत का टाटा बायबाय तुमच्या सचिनला?’’ म्हणाल्या, ‘‘हो! जागची उठले नाही मी.’’ माझा पुढचा प्रश्न तयार होता. ‘‘अहो, मग आजच्या स्वयंपाकाचं काय?’’ म्हणाल्या, ‘‘यांनी केला. सचिनसमोर काय तो भात नि आमटी! ते काय रोजचंच आहे..’’ मला त्या क्षणी माझ्या सासऱ्यांच्या इतका अभिमान वाटला. मार्ग दाखवणारी पिढी अशी असली तर पुढच्या पिढीत असा बदल होणं स्वाभाविक आहे.

मी ज्यांच्याकडे गाणं शिकते त्या माझ्या सरांचं याबद्दल खूप छान मत आहे. त्यांचं म्हणणं असं की आपण आपल्या बायकोवर प्रेम नाही केलं, मुलांसमोर तिचा आदर नाही राखला तर त्यांना त्यांच्या बायकांशी कसं वागायचं हे कसं कळेल. घराची लक्ष्मी जेव्हा खूश असते तेव्हाच तर घर प्रसन्न असतं. हा विचार घराघरात रुजला तर आयुष्य किती सोपं होऊन जाईल. बाईला बाई म्हणून नाही तर माणूस म्हणून प्रेमाने, आदराने वागवलं तर ती आपल्या क्षमतेपेक्षा कैकपटीने घरावर, घरातील माणसांवर, नोकरीवर, करियरवर केवढं तरी प्रेम करू शकते. तिच्या प्रेमाच्या वर्षांवाने ती कुठल्याही पुरुषाच्या कोरडय़ा आयुष्याला हिरवं-गार वळण देऊ शकते.

ही शिकवण नुसती आमच्या पिढीपर्यंत मर्यादित न राहता आमच्या पुढच्या पिढीतल्या रोजच्या आयुष्यातला भाग होऊन अंगवळणी पडेल असं दिसतंय. समानतेच्या ज्या गोष्टी आम्ही पुस्तकात वाचल्या आहेत त्या पूर्णपणे समाजात उतरतील. शिक्षण, नोकरी, राहणीमान या सगळ्या गोष्टीतूनच मोठमोठाले सांस्कृतिक बदल घडतील यात शंका नाही.

– स्नेहा देवस्कर

snehaparab@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:21 am

Web Title: kathakathan by sneha devaskar
Next Stories
1 ‘ती’ मधला  ‘तो’
2 बाप नावाचा माणूस
Just Now!
X