03 August 2020

News Flash

राजगड ते रायगड…

३१ डिसेंबरची पार्टी म्हणजे आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय!

३१ डिसेंबरची पार्टी म्हणजे आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय! नववर्षांचे स्वागत कसे कुठे करायचे यापेक्षा, त्याचा प्रमुख गाभा काय असतो ते सर्वानाच ठाऊक आहे, पण एका वेगळ्याच उदात्त हेतूने एकत्र येऊन नववर्षांचे स्वागत करावे या हेतूशी सहमत असणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहवासात ‘रायगड’वर ३१ डिसेंबर २०१५ ची रात्र, अर्थात १ जानेवारी २०१६ ची पहाट मी अनुभवली, त्याची ही कथा!

भारत भेटीला आल्यानंतर कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पाठीवर चारपाच दिवसांचा शिधा बांधून (तंबू, कॅमेरा आवश्यक) ट्रेकिंग अर्थात गिरीभ्रमंतीला जायचे! तीन खंडात गिरीभ्रमंतीचा अनुभव माझ्या गाठी आहे, पण हिमालय व सह्यद्रीत फिरणे याची तुलना मलेशिया, युरोप, अमेरिकामधील कुठल्याही पर्वतरोहणाशी करता येणार नाही, याची मला खात्री झाली आहे, म्हणूनच यावर्षी माझ्या धावत्या भेटीत सुद्धा ‘राजगड ते रायगड सिंगापूर (सिंहपूर) मार्गे’ ही पदभ्रमंती आई-वडिलांसोबत  करण्याचे निश्चित केले.

२७ डिसेंबरला सकाळी पुण्याहून नसरापूरमार्गे गुंजवणेला पोहोचलो. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या या गावात ‘उपद्रवमूल्य’ म्हणून किरकोळ कर घेतला जातो, ही समाधानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबरच कर्नाळ्याप्रमाणे गडावरच्या पाण्याच्या बाटल्या परत जमा करण्याची सक्तीकेली तर ‘राजांच्या’ गडाला चांगले दिवस येतील. पायथ्याशी असलेल्या उपाहारगृहात अगदी घरगुती स्वादाचे जेवण व ते प्रेमाने- आग्रहाने खाऊ घालणारे बांदल, यामुळे सुरुवात मस्त झाली! गरम गरम भाकरी, चिकन, झुणका, कारळ्याची चटणी! ‘यज्ञकर्म’ न समजता ‘उदरभरण’ करूनच दोन वाजता आम्ही राजगड चढायला सुरुवात केली. भर उन्हातही खाली दिसणाऱ्या सह्यद्रीच्या घनदाट जंगलाने मनाला खूप दिलासा मिळाला. चोर-दिंडीने पद्मावती माचीवर पोहोचायला अडीच तास लागले. खाली वर्दी मिळाल्यानुसार गडावर ‘राजगड प्रदक्षिणे’साठी ‘नेचर लवर’च्या कार्यकर्ते व सहभाग्यांचा तळ पडला होता. पद्मावतीचे देऊळ व रामेश्वरचे देऊळ- कुठेच जागा नसल्याने जिल्हापरिषदेच्या कचेरीबाहेर तंबू टाकायचे ठरवले. गोनीदांच्या पुस्तकात उल्लेख असलेल्या ढेबेंची आता दुसरी पिढी या गडावर पर्यटकांना दही, ताक, जेवण पुरवायचे काम करते आहे.  पण बाटलीबंद पाणी गडावर येणाऱ्यांनी का प्यावे? शुद्ध, स्वच्छ टाक्यातले पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना हा बाजार खटकतो. मुख्यत: त्या बाटल्यांचा खच जेव्हा बालेकिल्ला, चिलखती बुरुजाच्या कपारीत, गुंजवणे दरवाजा यांच्या वाटेवर अनगड ठिकाणी साठलेला पाहायला मिळतो तेव्हा स्थानिक लोकांपेक्षा पर्यटकांचे प्रबोधन करून त्यांना शिस्त कशी लावावी या विचाराने मन उद्विग्न होते.

तिन्हीसांजेला ‘सुवेळा’ माचीवर गेलो. जातानाची वाट कित्येक वर्षांपासून तशीच आहे, पण वाढत्या गर्दीमुळे नेहमी दिसणारा स्वर्गीय नर्तक काही यावेळी दिसला नाही.

सुवेळा माचीला जाताना लागणारा हस्ती प्रस्तर, १०-१२ फुटांचे नेढे, तटबंदीतील गणपती, सोनेरी किरणात न्हावून निघाले होते. दुसऱ्या कुठल्याही गडापेक्षा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असणारा हा गड उत्तर, पूर्व, पश्चिम दिशांच्या माच्यांमुळे भुरळ घालतो. राजांनी तोरणावर सापडलेल्या धनातून गडदुर्गाची विचारपूर्वक पुनर्बाधणी केली. त्यातील ‘राजगड’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा! त्यांच्या आयुष्याची जास्तीत जास्त (२५—३० वर्ष) कारकीर्द या गडाने पाहिली आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार हा ‘राजगड’.. त्याचे भग्न अवशेष मनाला खिन्न करतात, पण गडप्रेमींच्या पंढरीची ही वारी त्या ‘पांडुरंग’ राजांचा इतिहास मनात घोळवत आणि पुन:पुन्हा भेटण्याची खूणगाठ मनात बांधूनच पूर्ण होते.

सुवेळा माचीकडे खाशा सरदारांच्या वाडय़ांचे  अवशेष, डुबा व बुलुंद तटबंदी, शिवाय समोर दिसणारा भाटघर धरणाचा येसाजी कंक जलाशय- मावळतीची उन्हे पसरलेली आहेत आणि कारवीच्या वासाने परिसर भरून राहिलेला आहे! मन शिवकाळातून जमिनीवर आले तरी आपले नसते. तंबू सकट उडून जाऊ  इतका रात्रभर वाऱ्याचा वेग होता. २८  डिसेंबरला सकाळी बालेकिल्लय़ावर जातानाही या वाऱ्याने अगदी भंबेरी उडवली. एकतर बालेकिल्ल्याच्या खोबणीतल्या त्या पायऱ्यांना ‘पायऱ्या’ म्हणणे चूक ठरेल. पुढचे काही दिसत नाही, खाली खोल दरी, वर जाण्याशिवाय गत्यंतर नाही! ३०० फुटांचा तो कडा सोसाटय़ाच्या वाऱ्याला न जुमानता चढताना पुन:पुन्हा राजांच्या कर्तृत्वाची आठवण करून देत होता. शेवटी त्या अनोख्या षटकोनी बुरुजाशी येऊन पोहोचल्यावर आतल्या बुलुंद बालेकिल्ल्याचे गतवैभव दृष्टीस पडले. नितळ असे ब्रह्मर्षी तळे, चंद्रतळे, जननी, ब्रह्मर्षी देऊळ, चौक्या, कोठारे, सदर, बाजारपेठ, ऊन-वारा-पावसाला न जुमानता (गेली ३५० वर्षे) अजूनही तग धरून आहेत. राजगडाचा बालेकिल्ला पाहिल्यावर महाराजांच्या दूरदृष्टीची खात्री पटते. उगाच नाही औरंगजेबाने हा किल्ला घेतल्यानंतर ‘किल्लेदार’ म्हणून राहायलाच कोणी मिळाले नाही. सिंहगड, पुरंदर, रायरेश्वरचे पठार, महाबळेश्वर, मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, तोरणा यांचे दर्शन बालेकिल्ल्यावरून घेता येते. १३९४ मीटर उंचीवर हा बालेकिल्ल्याचा माथा, सभोवतालचा परिसर पूर्ण अवलोकन करायला किती योग्य होता ते कळते. बालेकिल्ल्यावरून खाली येताच अलिकडची वाट पकडून संजीवनी माचीकडे निघालो. वाटेत पाली दरवाजा, (खाली वाजेघर गाव) मागे टाकत, बालेकिल्ल्याला वळसा घालत, संजीवनी माचीकडे जाणारा रस्ता लागतो. संजीवनी माचीची चिलखती (दुहेरी) तटबंदी, तटबंदीतले  बुरुज, बुरुजात उतरणाऱ्या पायऱ्या, देवडय़ा.. असे वाटते एक-दोन दिवस नाही, चांगले महिनाभर राहिलो तरी गड निरखून पाहणे होणार नाही. संजीवनी माचीकडे जाताना टेहळणी बुरुज आहे. तिथून समोर तोरणा खुणावताना दिसतो.

आम्ही संजीवनी माची पाहून परत पद्मावती माचीवर आलो तेथे थोडी पोटपूजा केली. दुपारी दीडच्या सुमारास संजीवनी माचीच्या अळू दरवाजामार्गे गड सोडला. वाटेवरच उजवीकडे अळू दरवाजा लागतो. त्या दरवाजाने उतरणारी वाट आपल्याला नेऊन सोडते डोंगर धारेवर. भोर व वेल्हे तालुक्याला विभागणारी ही धार! ही धार वर संजीवनी माचीवरूनही आपण स्पष्ट पाहू शकतो. पण ही माचीला वळसा घालून जाणारी वाट, ‘वाटच’ लावते. मुरमाड वाट सरळ खाली घेऊन जाईल, अशी भीती वाटते. उजवीकडची धार मध्ये कारवीच्या जंगलातून, कधी उघडय़ा डोंगर माथ्याकडून गेली आहे. पण संध्याकाळ होण्यापूर्वी धारेवर असलेल्या एकमेव ‘झोपडी’कडे पोहोचणे एवढेच आमचे ध्येय होते. त्यामुळे सावकाश उतरलो.

राजगडाप्रमाणे तोरण्यावरही डागडुजीचे काम जोरात चालू आहे. तोरण्याच्या पूर्वीच्या नावाप्रमाणेच ‘प्रचंडगड’ असल्याचे जाणवते. वेळ नसल्याने बुधला माचीवर न जाता सरळ मोगाईचे देऊळ गाठले. वाटेत चित्त दरवाजा, दारूखाना, सदरेचे अवशेष दिसतात, पण राजगडापेक्षा तोरणा उंच आहे (१४०८ मीटर), प्रचंडही आहे. झुंजार माचीवरून खाली उतरता येत नाही, पण तिथेही चिलखती बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर मोठी टाकी आहेत, ही जमेची बाजू. राजांच्या गडांपैकीच हा एक. कोठी दरवाज्यातून बिनी दरवाजा करीत उतरायला सुरुवात केली की गाव दिसते. पण मध्ये आधारासाठी रेलिंगचा उपयोग करावा लागतो. प्रसंगी ‘खडतर’च वाट आहे.

दुपारी तीन वाजता वेल्हे गावात क्षुधा-शांती करून आम्ही केळद-काणद खिंडीतून सिंगापूर (सिंहपूर) गाठायचे ठरवले. चढ-उताराच्या वाटांनी दमछाक झाली, तरी वेळ वाचतो. पण गाडी रस्त्याने चालणे कंटाळवाणे होते. केळद खिंडीतून थेट सिंगापूर (सिंहपूर) मोहरीच्या रस्त्याला आम्ही लागलो. सूर्यास्त होईपर्यंत खूप छान वाटत होते. वाटेत लोकांनी ठिकठिकाणी फार्म हाऊससाठी जागा अडवल्या आहेत. पण मनुष्य वस्ती नाहीच! ट्रकने सिंगापूरचा मुक्काम गाठला. सूर्यास्ताच्या सोनेरी किरणात लिंगाणा व सुबक असे सिंगापूरचे गाव- गाव काय तर १४-१५ घरे! पण मला तर हे महाराष्ट्रातले सिंगापूर फार भावले. सह्यद्रीच्या माथ्यावर डोंगरांच्या कुशीतले इटुकले गाव. अशी गावे भारतातून परत गेल्यावर कधी तरी आठवली, की मन कातर होते. गावच्या सरपंचांनी आमचे स्वागत केले. तंबू न लावता घरात राहण्याचा आग्रह केला. चूल वापरायला दिली- आणखी काय पाहिजे?

मोहरी गावातून लिंगाण्याचा सुळका दिसतो. गिर्यारोहकांना आकर्षक वाटणारा पण शिवकाळात ‘तुरुंग’ म्हणून वापरलेला तोच हा ‘लिंगाणा’. शिवाजी पोटे या तरुण सरपंचाने गावाचा कायापालट केलाय. याशिवाय लिंगाण्यावर चढाई करायला येणाऱ्यांची भाजी-भाकरीची सोय पुरवणे वगैरे मदत खुल्या दिलाने करायला तयार असतात. अशा माणसाचे मातीचे पाय आहेत म्हणून आपले सह्यद्रीचे कडे व तेथील गावे शाबूत आहेत.

३० डिसेंबरला सकाळी शिवाजींचे वडील सिंगापूरच्या नाळेकडे जाणारा रस्ता दाखवायला आले. हा सिंगापूर ते कोकणात उतरणारा रस्ता व्हाया सिंगापूर नाळ अप्रतिम! मनुष्य वस्ती अजिबात नाही पण सृष्टी सौंदर्य, सह्यद्रीची अनगड रूपे, वेड लावणारी पायपीट, याचा साक्षात्कार व्हावा तो अशाच वाटेवर! लिंगाणा पुन: पुन्हा दृष्टीस पडत होता, आम्ही सिंगापूरच्या नाळेतून कोकणात उतरलो. ‘दापोली’ (रत्नागिरीचे दापोली नव्हे) गावात रायगड समोर दिसू लागला होता. पण..! ८६० मीटर असलेला रायगड, कोकणातला हा गड कोणत्याही वाटेने जा कठीणच आहे. राजांनी मुद्दाम राजधानी करण्याचे कारण काय असावे ते चढताना जाणवले. दापोली गावातून नदीच्या काठाकाठाने सुंदर हमरस्त्यानेच वाघिरे गावातून एका ‘धनगर’ पाडय़ात पोहोचलो व लक्ष्य ठेवले टकमक टोक! कारण टकमक टोकाला वळसा घालूनच रायगड सर करायचा होता. लिंगाणा बराच मागे राहिला. आतापर्यंत लिंगाण्याला २७० डिग्री प्रदक्षिणा घातली होती. सूर्यास्ताने पुन: मनोहरी रूप दाखवले.  चित दरवाजाजवळील विश्रांतीगृहात चिकन थाळीवर मस्त ताव मारला व रायगडची वाट चढायला संध्याकाळी सात वाजता सुरुवात केली. मूनलाइट ट्रेकला या पूर्वी वैष्णोदेवीला आणि मलेशियात किनाबालूला, कॅलिफोर्नियामध्ये माउंट विल्सन असेच रात्री चढले होते. पण ही चढण वाळूसरे खिंडीतून घोंघावणाऱ्या वाऱ्याने सुस झाली. गड पाहून उशीर झालेले पर्यटक उतरताना आश्चर्यचकित होत होते. ‘आता कसे वर जाणार?’ पण चांदणे, थंड वाऱ्याची साथ व सगळ्यात मुख्य शिवतीर्थावर पोहोचण्याची ओढ आम्हाला दीड तासात महादरवाज्यात नेऊन गेली. आज सकाळपासून  जवळ जवळ १३ तासांची पायपीट झाली होती. तंबू लावताच निद्रादेवीच्या स्वाधीन कधी झालो कळलेच नाही!

३१ डिसेंबरला सकाळी रायगडावरचा सूर्योदय, रम्य पहाट अनुभवताना खूप आनंद झाला. पूर्वीपासून रायगडावर झाडी कमी, जोराचे वारे आणि खडकाळ जमीन यामुळे असेल, पण खालून वेढलाय मात्र दाट जीवघेण्या जंगल वाटांनी.सकाळी शिरकाईच्या मंदिरापासून सुरुवात केली. बाजारपेठ पाहतो तोवर रोपवेने येणाऱ्यांची गडबड सुरू झाली.  भवानी कडा व वाघ दरवाजातून दिसणारे दृश्य खरेच खूप विलोभनीय आहे. वाटेत दारू कोठार, वाडे, पाहत स्मारकाकडे पोहोचलो. महाराजांची समाधी- शिवतीर्थावर कुत्र्याच्या समाधीचे गालबोट याकडे दुर्लक्ष करीत समाधीच्या पायरीवर मस्तक टेकले. शरीराचे अणुरेणू या थोर पुरुषाच्या कर्तृत्वाने शहारले. मन शिव-भक्तीने ओथंबून गेले.

पुन: संध्याकाळी वाघ दरवाजा, राणी महाल, नगारखाना, अष्टप्रधानांचे वाडे, मेणा दरवाजा, तसेच नगार-खान्यातून राजगड व तोरणा पाहिला. सूर्यास्तासाठी हिरकणी बुरुजावर गेलो. मावळतीचे रंग मातृप्रेमाचा जाज्वल्य इतिहास आठवत अनुभवले.

परदेशात गेल्यानंतर या आठवणीच कठीण प्रसंगांशी सामना करायला बळ  देतात व कोणत्याही बिकट क्षणी या युगपुरुषाची आठवण सदैव वेगळे काहीतरी करायची प्रेरणा देत राहते.
यमुना फळ – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2016 1:09 am

Web Title: rajgad to raigad
Next Stories
1 मारथाण्याची बिकट वाट
2 दुर्गत्रिकुटाची डोंगरयात्रा
3 हरिश्चंद्राची परिक्रमा
Just Now!
X