News Flash

दापोलीचा निसर्ग

कोकण म्हटले, की डोळय़ांपुढे हिरवाईने भरलेला निसर्ग येतो. डोंगर-झाडी, वृक्षवेली, नद्या-झरे, देवराया-आमराया आणि छोटी छोटी खेडी या साऱ्यांतून कोकणचे हे निसर्गसौंदर्य आजही आकर्षित करते. कोकणातील

| May 14, 2014 07:48 am

कोकण म्हटले, की डोळय़ांपुढे हिरवाईने भरलेला निसर्ग येतो. डोंगर-झाडी, वृक्षवेली, नद्या-झरे, देवराया-आमराया आणि छोटी छोटी खेडी या साऱ्यांतून कोकणचे हे निसर्गसौंदर्य आजही आकर्षित करते. कोकणातील अशाच दापोली परिसराची ही भटकंती.
उत्तर कोकणच्या (ठाणे व रायगड) तुलनेत दक्षिण कोकण (रत्नागिरी व सिंधुदुर्ग) आजच्या घडीला तरी अधिक निसर्गसमृद्ध आहे. जास्त पावसामुळे आढळणारी आद्र्र पानझडी व मिश्र सदाहरित जंगलं आणि मुंबई-पुण्यापासूनचं भौगोलिक अंतर ही यामागील कारणं आहेत. दक्षिण कोकणचं उत्तर टोक असलेले मंडणगड व दापोली तालुके वनाच्छादित डोंगराळ प्रदेशामुळे निसर्गप्रेमी व निसर्ग अभ्यासकांना आकर्षति करतात. एकप्रकारे हा भाग दक्षिण कोकणचं प्रवेशद्वारच आहे.
कोकणात वेळोवेळी केलेल्या भटकंतीमध्ये या भागात बऱ्याच वेळा रानावनात फिरण्याची संधी मिळाली. अलीकडेच जनसहभागातून संवर्धन या विषयावरील ‘बीएनएचएस’च्या अभ्यासाकरिता या दोन तालुक्यांमध्ये बरंच फिरणं झालं. केवळ समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त इथं बरंच अनुभवण्यासारखं आहे. समृद्ध दक्षिण कोकणची इथं एक झलक पाहायला मिळते.
लोणेरेला मुंबई-गोवा महामार्ग सोडून आंबेत माग्रे जाऊ लागलो की रायगड जिल्ह्यातच जंगल व डोंगराळ मुलखाची सुरुवात होते. पुढे सावित्री नदीवरील पूल ओलांडून आपण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतो तेव्हा झाडी असलेले डोंगरपट्टे अधिक विस्तीर्ण झाल्याचं जाणवतं. इथं दिवसा लंगूर वानरं व संध्याकाळी कोल्हे सहज दिसतात. लोणेरेला महामार्ग न सोडता पुढे खेडपर्यंत जाऊन दस्तुरी फाटा माग्रेही मंडणगड गाठता येतं. या साऱ्या भागातील जंगलात व रस्त्याच्या दुतर्फा सावर, आपटा, सागवान, उंबर, आंबा, आवळा, गिरिपुष्प, सातवीण, वड, िपपळ, काजू, काशिद, शेवगा, फणस, बांबू, कदंब, भेंड, खैर व पांगारा दाटीवाटीनं सापडतात. अधेमधे आमरायादेखील आहेत.
या मार्गावर पांढऱ्या पोटाचा व लांब चोचीचा खंडय़ा, खाटिक, वेडा राघू, टकाचोर, काळा कोतवाल, रानभाई, राखी वटवटय़ा व नारद बुलबुल सहज दिसतात. मागच्या खेपेला मी इथं उदमांजर, मोर व दुर्मिळ होत चाललेलं पांढऱ्या पाठीचं गिधाड पाहिलं होतं. मंडणगड गावाच्या पुढेही जंगल तितकंच दाट आहे. एका मध्यम आकाराच्या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाच्या काठावरील डोंगरांतलं घनदाट जंगल आपलं लक्ष वेधून घेतं. बाणकोट व मंडणगड असे दोन किल्ले याच परिसरात आहेत. किनाऱ्यालगतच्या रस्त्यानं जाताना बाणकोट किल्ला बाजूच्याच डोंगरावर दिसतो, तर त्याचा एक टेहेळणी बुरूज रस्ता व समुद्र यांच्यामध्ये सपाटीवर आहे. बुरूज व किल्ला यांना जोडणारा भूमिगत मार्ग पूर्वी वापरत होता असं सांगितलं जातं. वेळास-केळशी नारळी-पोफळीच्या बागा असलेलं वेळास हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं टुमदार गाव आहे. मराठेशाहीतील थोर मुत्सद्दी नाना फडणवीस यांचं हे जन्मगाव. त्यांचं एक छोटंसं स्मारक गावात शिरल्यावर लगेच दिसतं. गेल्या काही वर्षांत वेळासची एक नवी ओळख निर्माण झाली आहे ती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात इथं भरणाऱ्या कासव महोत्सवामुळे. मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणांहून निसर्गप्रेमी पर्यटक वाळूमधील अंडय़ातून बाहेर येणाऱ्या या सागरी कासवांच्या पिलांना पाहायला मोठय़ा संख्येनं येतात. चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेनं अनेक र्वष जनजागृती करून इथं कासव संवर्धन व निसर्ग पर्यटन यांचा सुंदर मिलाफ जुळवून आणलाय.
वेळासहून केळशीला जाताना वाटेत पुन्हा दाट जंगलानं आच्छादलेले डोंगर व त्यातून जाणारा नागमोडी रस्ता लागतो. तत्पूर्वी वाटेत पडले किनाऱ्यावर शेकडो समुद्रपक्षी (गल) विसावलेले मनोहर दृश्य आम्हाला दिसलं. खाडीकिनारी वसलेल्या या सुंदर गावातही नारळी-पोफळीच्या मोठय़ा बागा आहेत. काहींनी मसाल्याच्या झाडांची लागवड केली आहे. गाव इतकं निसर्गरम्य असल्यानं कृषी पर्यटनसुद्धा प्रसिद्ध होऊ लागलंय. केळशीच्या आसपासच्या डोंगरातील रानात पट्टेरी वाघाचं अस्तित्व अधूनमधून असल्याचं स्थानिक लोक खात्रीनं सांगतात. त्याशिवाय बिबटय़ा, रानडुक्कर, भेकर, तरस, ससा व रानमांजर असे प्राणी इथल्या रानात आहेत. मात्र कीटकनाशकांनी बाधित खेकडे खाल्ल्यानं इथले कोल्हे कमी झाल्याचं सांगितलं जातं.
केळशीच्या दक्षिणेला तितकंच सुंदर आंजर्ले गाव आहे जे कडय़ावरच्या गणपती मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. मंदिरामागील सडय़ावर संध्याकाळी काही वेळ बसलं तर मलबार करडा धनेश, ब्राह्मणी घार व समुद्री गरुड दिसू शकतो. आंजर्ले ते हर्णे खाडीवरील पुलावरून जाताना विस्तीर्ण खारफुटीची वनं दृष्टीस पडतात.
कुडावळे देवराई मंडणगड दापोली रस्त्यावर कुडावळे गावातील देवराई आपल्याला एका धीरगंभीर व प्रसन्न वातावरणात घेऊन जाते. आभाळाला गवसणी घालणारे जांभूळ, आंबा व बेहेडासारखे महाकाय वृक्ष, त्यांची आधार देणारी अवाढव्य बट्रेस रूट्स, वृक्षांखालील जाळीत दिवसाही ऐकू येणारा रातकिडय़ांचा आवाज, उपयुक्त बोर्लीमाडची झाडं, मोठमोठय़ा वेली, ग्रामदैवताची दोन छोटीशी शांत देवळं, बाजूनंच वाहणारा निर्मळ पाण्याचा झरा आणि त्यातील खेकडे व छोटे मासे, हे सगळं अनुभवून आपल्या निसर्गपूजक संस्कृतीची प्रचिती येते. देवराईच्या जवळच राहणाऱ्या दिलीप कुलकर्णी यांची पूर्णत; निसर्गअनुकूल, स्पृहणीय व तितकीच तपस्वी जीवनशैली पाहून व यांच्याशी बोलून खऱ्या शाश्वत विकासात योगदान देण्याची इच्छा मनात निर्माण होते.
दापोलीच्या दक्षिणेला लोकमान्य टिळकांचं जन्मगाव असलेलं चिखलगाव आपल्या स्वागताला उतारावरील जंगल, सडे, आमराया व झुळझुळ वाहणारे निर्झर अशा निसर्गलीला घेऊन तयार असतं. या परिसरात बिबटय़ा, तरस, भेकर, मलबार कवडय़ा धनेश व मलबार करडा धनेश दिसतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नीलगायसुद्धा येथील सडय़ांवर आढळते. सामान्यत: हा प्राणी शुष्क खुरटं रान किंवा उघडय़ा प्रदेशांत दिसून येतो. त्यामुळे दाट जंगलांच्या कोकणात नीलगाय कशी आढळते हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. येथील लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबत व्यावसायिक प्रशिक्षण व शाश्वत विकास याचंही शिक्षण आसपासच्या ४६ गावांतील मुलामुलींना दिलं जातं.
आसूदसारख्या गावात बागायती, नसíगक जंगल व त्यात दडलेलं दगडी केशवराज मंदिर, बारमाही झरा आणि या साऱ्याला शोभतील अशी सुबक घरं असं ‘पिक्चर पोस्टकार्ड’ चित्र पाहायला मिळतं. साखलोली, गव्हे, पालगड व कोळथरे ही अशीच निसर्गरम्य गावं आहेत.
मंडणगड-दापोली परिसरातील बऱ्याच ठिकाणी जंगलं अजून टिकून आहेत. वनस्पती, पक्षी, प्राणी व कीटक यांची विविधताही बरीच आहे. काही ठिकाणी पावसाळय़ापूर्वी काजवे प्रचंड संख्येनं एकाच झाडावर जमले की सबंध झाडच लक्ष दिव्यांनी उजळून निघतं, परंतु मनाचे व परिसराचे वाढते शहरीकरण, सोकावणारा चंगळवाद, काही भागांत चालू असलेलं अवैध खाणकाम व नासाडी करणारी शहरी संस्कृती यामुळे दिवसामागे हे निसर्गशिल्प आता भंग पावू लागलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2014 7:48 am

Web Title: nature view of dapoli
Next Stories
1 खांदेरी उंदेरीची मोहीम
2 ‘त्या’ हीमप्रपाताची आठवण
3 ट्रेक डायरी: कोराईगडावर स्वच्छता मोहीम
Just Now!
X