ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्य़ांच्या सीमेवर असलेला हरिश्चंद्रगड गिरीप्रेमी आणि निसर्गप्रेमींना सतत आकर्षित करत असतो. गडाचा इतिहास, तिथला निसर्ग आणि या जोडीने या गडाला लाभलेला खोल कोकणकडा या साऱ्यांमुळे भटक्यांची पावले सतत हरिश्चंद्रगडाकडे धावत असतात. गडाची ओळख असलेल्या या कोकणकडय़ावरच मुंबईच्या ‘हायटेक अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या डिसेंबर महिन्यात एका साहसाचे आयोजन केले आहे. हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा म्हणजे थेट दोन हजार फुटांची खोल धार आहे. गडाच्या पश्चिम अंगाला कोकणात कोसळणारा हा कडा पोटातही खपाटीला गेल्याने तो नुसता पाहताना सुद्धा अनेकांना गरगरायला होते. अशा या कोकणकडय़ावर ‘हायटेक अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २६ जानेवारी रोजी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कोकण कडा ते शेजारील भवानीची धार दरम्यान १२०० फूट लांबीचे टायरोलिअन ट्रॅव्हर्स (दोरीच्या साहाय्याने एका कडय़ावरून अन्य कडय़ावर जाणे) असा साहसी उपक्रम राबवला जाणार आहे. या शिवाय संस्थेतर्फेच २३ ते २६ डिसेंबर दरम्यान रतनगडाच्या पायथ्याशी सांधण खिंडीत रॅपलिंग (दोरीच्या साहाय्याने कडा उतरणे) शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी तुषार मोडक (९८९२२२५६१५) किंवा वर्षां (९९२०९६१००३) यांच्याशी संपर्क साधावा.