जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी वाढतं वय कधीच समस्या ठरु शकत नाही. जपानमधील एका 90 वर्षांच्या आजींनी हे खरं करुन दाखवलंय.

हमाको मोरी (Hamako Mori) असे या आजीबाईंचं नाव असून त्यांना ‘गेमर ग्रँडमा’ या नावानेही ओळखलं जात. त्यांना व्हिडिओ गेमची प्रचंड आवड. वयाच्या 39 व्या वर्षापासून त्यांनी गेम खेळायला सुरूवात केली आणि 2015 मध्ये त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. दर महिन्याला त्या आपल्या चॅनेलसाठी किमान चार व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यांना ऑनलाइन गेम खेळण्याची इतकी आवड आहे की, जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे.

18 फेब्रुवारी 1930 रोजी हमाको यांचा जन्म झाला आणि गेमिंगच्या दुनियेत त्यांनी 1981 मध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं. वय वाढत असतानाही या आजीबाई दिवसातून किमान सात ते आठ तास दररोज गेम खेळत असतात. तरुणपणी हे प्रमाण यापेक्षाही जास्त होतं, पण आता वयानुसार त्यांचं गेम खेळण्याचं प्रमाण कमी झालंय.

“इतके वर्षे जगल्यानंतर…मला असं वाटतंय की दीर्घ कालावधीसाठी गेम खेळण्याचा माझा निर्णय योग्य होता… मी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा आनंद घेतेय”, असं हमाको मारी यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदणीवेळी म्हटलं आहे. कॉल ऑफ ड्युटी, डाँटलेस आणि NieR: Automata असे अनेक गेम त्या खेळतात. पण, ‘ग्रँड थेफ्ट ऑटो 5’ हा या आजीबाईंचा सर्वात आवडता गेम आहे. हमाको यांचं गेमिंगमधील कौशल्य वाखाणण्यासारखं आहे. यु ट्यूबवर त्यांच्या चॅनेलचे 250,000 पेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.