आॅनलाईन शाॅपिंगच्या विश्वात आपण सगळेच आता रमलोय. आताही हा लेख वाचत असताना तुम्ही एखाद्या ई-काॅमर्स वेबसाईटवरून इथे आलेले असल्याची दाट शक्यता आहे. पण ते प्रचंड सोयीचंही आहे. आपल्याला हवी ती वस्तू आॅनलाईन बघून, पारखून, किंमतींची तुलना करत घरबसल्या मागवण्याची सोय झाल्याने आपल्या सगळ्यांची मोठी सोय झाली आहे.

भारतात तरी या क्षेत्रात अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा अनेक कंपन्या असल्या तरी जागतिक पातळीवर ई-काॅमर्स क्षेत्रात ‘अॅमेझाॅन’चा दबदबा वादातीत आहे. भारतातही ‘फ्लिपकार्ट’ ला तगडी स्पर्धा देत अॅमेझाॅन हळूहळू बस्तान बसवतेय. पण आता जागतिक बाजाराबाहेरही जाण्याचे ‘अॅमेझाॅन’ चे प्लॅन्स आहेत. आता अॅमेझाॅन चंद्रावरसुध्दा डिलिव्हरी देणार आहे.

अॅमेझाॅनचा सीईओ जेफ बेझाॅसच्या मालकीची ‘ब्लू ओरिजिन्स’ ही आणखी एक कंपनी आहे. अंतराळपर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी असं या कंपनीचं वर्णन केलं जात असलं तरी अंतराळात ‘कार्गो’ पाठवण्याबाबत या कंपनीत संशोधन चालू असतं. विमानातून एखादी साधीशी गोष्ट परदेशी पाठवायची म्हटल्यावरही खूप खर्च येतो. आता अशा वस्तू थेट अंतराळात पाठवायच्या असतील तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाची कल्पनाच केलेली बरी.

जेफ बेझाॅसने अॅमेझाॅनमधल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एक अंतर्गत ई-मेलमध्ये सांगितलंय की २०२० सालापर्यंत अंतराळात कार्गो पाठवण्याचं काम ‘नासा’कडून खाजगी कंपन्यांना दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अॅमेझाॅन तयार राहणार असल्याचंही बेझाॅसने म्हटलंय. आपल्या या ई-मेलमध्ये चंद्रावर सामान पोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या एका वाहनाविषयीही जेफ बेझाॅसने माहिती दिली आहे. एकूणच आता कार्गो पोचवण्याच्या क्षेत्रात अॅमेझाॅनने सगळ्या सीमा भेदायची तयारी केली आहे.

फक्त चंद्रावर ‘सेम डे डिलिव्हरी’ मिळणार का याविषयी सध्यातरी जेफ बेझाॅसने काही म्हटलेलं नाहीये!