सर्व सामान्यांना कायम पडणारा प्रश्न म्हणजे चांगला फोटो काढता येईल असा फोन कोणता? पण टेकसेव्ही युझर्सला फोटो क्लिक करण्यासाठी सर्वोत्तम फोन हा गुगल पिक्सल आहे. अगदी कमी प्रकाश असो किंवा अस्थिर गोष्ट या फोनमधून इतर कोणत्याही महागड्या फोनपेक्षा जास्त चांगले फोटो येतात. नुकताच याचा प्रत्यय महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना आला. त्यांनी आपल्या पिक्सल फोनने काढलेला फोटो ट्विट केला आणि त्या फोटोच्या कॅप्शनमुळे तो व्हायरल झाला.

नेहमीच ट्विटवर अॅक्टीव्ह असणारे आनंद महिंद्रा हे आयफोन एक्स वापरतात. मात्र नुकताच त्यांनी पिक्सल फोन घेतल्याचे समजते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये महिंद्रा यांनी रस्त्याच्याकडेला उभा राहून क्लिक केलेला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रकाश कमी असूनही गुगल पिक्सलने काढलेला हा फोटो फारच सुंदर आहे. या फोटोबद्दल महिंद्रा लिहितात, ‘मॅनहॅटन मोनोस्केप. माझा पिक्सल फोन हा माझ्या आयफोन एक्सपेक्षा चांगले फोटो क्लिक करतो हे मान्यच करावं लागेल. आणि मला कळलयं की सॅमसंगमधून यापेक्षाही चांगले फोटो येतात?’

पिक्सलचे कोणते मॉडेल महिंद्रा वापरतात हे त्यांनी ट्विटमध्ये सांगितलेले नाही. तरी काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोवरुन ते पिक्सल थ्री आणि पिक्सल थ्री एक्सएल वापरत असल्याचा अंदाज बांधता येतो.

महिंद्रांच्या या ट्विटनंतर लगेचच सॅमसंगने संधीचा फायदा घेत आनंद महिंद्रांना गॅलेक्सी नोट टेन वापरण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, पिक्सल सुरुवातीपासूनच आपला कॅमेरा हा इतर कोणत्याही फोनच्या कॅमेरापेक्षा अधिक सक्षम असल्याचे सांगत आले आहेत. तर महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेकांनी ‘आम्ही आधीपासूनच हे सांगतोय,’ अशा अर्थाचे ट्विट केले आहेत.