एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पूर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८७ जणांनी आपले प्राण गमावले असून एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे. राज्यामध्ये पूर संकट आलेले असताना संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. स्टेट बँकेने पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी थेट फ्लोटींग म्हणजेच होडीवरील शाखा सुरु केली आहे. या शाखेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> …तर पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना ‘हा’ देश देणार दोन लाखांहून अधिक निधी

ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आहे अशा ठिकाणी स्टेट बँकेने फ्लोटींग शाखा सुरु केल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अशाच एका फ्लोटींग शाखेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. “स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी पुराचा फटका बसलेल्या गावातील लोकांना बँकेच्या सेवा पुरवण्यासाठी आणि या कठीण काळामध्ये या गावकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सर्वजण एकत्र मिळून या पूर परिस्थितीवर नक्कीच मात करु”, अशी कॅॅप्शन या व्हिडिओ देण्यात आली आहेत.

नक्की पाहा >> Viral Video : पुराच्या पाण्यात सारं काही बुडालं, ‘हे’ शेकडो वर्षांपूर्वीचं मंदिर मात्र वाचलं

काय आहे फ्लोटींग बँक?

एसबीआयने सुरु केलेल्या या फ्लोटींग बँकमध्ये थेट बोटीवर बँकेने काउंण्टर सुरु केलं आहे. या बोटीवरील बँकेचे कर्मचारी लॅपटॉपवरुन स्थानिकांना मदत करत आहेत. व्हिडिओमध्ये बँकेच्या या फ्लोटींग शाखेसमोर महिलांची गर्दी दिसत आहे. या महिलांकडून आवश्यक ती माहिती घेऊन त्यांना तिथेच रोख रक्कम दिली जात आहे. नदीच्या एका किनाऱ्यावरील महिलांचे काम झाल्यानंतर ही फ्लोटींग शाखा नदीमधून पुढील ठिकाणी जातानाही व्हिडिओत दिसत आहे.

नक्की पाहा >> Video: भाजपा आमदार पुराच्या पाण्यात उतरुन करतोय मदतकार्य; मोफत अन्नाची सेवाही केली सुरु

दोन मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून एसबीआयने सुरु केलेल्या या फ्लोटींग ब्रँचच्या संकल्पनेचे अनेकांनी कौतुक केलं आहे. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी एसबीआयने चांगला निर्णय घेतला असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओखाली दिल्या आहेत.