जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक देशांनी चीनच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. अनेक देशांनी उघडपणे चीनविरोधी भूमिका घेत त्यांचा विरोध केला. एकीकडे चीनविरोधात जगभरामध्ये संताप असतानाच आता चीनच्या अधिकाऱ्याने केलेला एक विचित्र प्रकार समोर आल्याने चीनवर पुन्हा टीका होताना दिसत आहे.  पॅसिफिक महासागरातील किरिबातमी या छोट्या बेटावर चिनी राजदूताने चक्क लोकांच्या पाठीवर चलत प्रवेश केला. या स्वागत समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून या कृत्याचा विरोध केला जात असल्याचे वृत्त ‘डेली मेल’ने दिलं आहे. चीनचे राजदूत तांग सोनग्गेन यांच्या स्वागतासाठी लोकांना पालथं झोपवून रेड कार्पेट तयार करण्यात आल्यानंतर यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या एका राजदूताने चिनी राजदूताच्या या कृत्यावर प्रश्न उपस्थित करत हे सभ्य समाजाचे लक्षण नसून अशी वागणूक कोणालाही देणं मानवाला शोभत नाही असं म्हटलं आहे.

अमेरिकेने या विषयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर चीननेही संताप व्यक्त केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक जारी करत चीनच्या राजदूतांनी किरिबातीमधील पारंपारिक स्वागत समारंभामध्ये सहभाग नोंदवला होता असं म्हटलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन यांनी किरिबाती सरकार आणि स्थानिक लोकांनी आग्रह केल्याने चिनी राजदूत तेथील परंपरेचा मान राखण्यासाठी लोकांच्या पाठीवरुन चालल्याचे स्पष्ट केलं आहे. काही लोकं या प्रकरणावरुन किरिबातमी आणि चीनच्या नात्यामध्ये मिठाचा खडा टाकू पाहत आहेत. मात्र त्यांना यामध्ये यश मिळणार नाही, अशी टीकाही झाओ यांनी अमेरिकेचे नाव न घेता केली. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. चीनी राजदूत किरिबातीमध्ये उतरल्यानंतर तेथील स्थानिक पुरुषांच्या आणि लहान मुलांच्या पाठीवरुन चालतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळी पॅण्ट घातलेला व्यक्ती ३० लोकांच्या पाठीवरुन चालताना दिसत आहे.

चीन आणि किरिबातीचे राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर आपण तिथे गेले होते असं राजदूत असणाऱ्या तांग यांनी स्पष्ट केलं आहे. टीकाकारांनी चीनची उपभोग घेण्याची वृत्ती या फोटोमधून दिसून येत असल्याचा टोला लगावला आहे. किरिबाती हे पॅसिफिक महासागरातील एक छोटा बेटवजा देश आहे. समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी हा या देशासमोरील सर्वात गहण प्रश्न आहे. किरिबातीने तैवानबरोबर असलेले मैत्रिपूर्ण संबंध तोडत चीनबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बेटावर चीनचं स्पेस ट्रॅकिंग स्टेशनही आहे. किरिबातीच्या मदतीने पॅसिफिक महासागरामध्ये चीन आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. पॅसिफिक महासागरामध्ये कायमच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. मागील काही काळापासून चीनविरोधात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने उघडपणे भूमिका घेतल्याने चीनने किरिबातीसंदर्भातील वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.