काश्मीरमध्ये लागू असलेले विशेषाधिकाराचे वादग्रस्त कलम-३७० रद्द करून सरकारने एक ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सर्व थरांतून चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर काहींनी टीका केली तर काहींनी मोदी सरकारची स्तुती केली. दरम्यान दिल्लीतील एका रेस्टारेंटमध्ये चक्क ‘आर्टिकल ३७०’ या नावाची थाळी सुरु करण्यात आली आहे. अत्यंत महागड्या अशा या थाळीवर जम्मू काश्मीरमधील रहिवाश्यांसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे.

दिल्लीतील ऑर्डर २.१ हे पंचतारांकीत रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच ग्राहकांना खुश करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग राबबले जातात. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यांनी ‘बाहुबली’ व ‘५६ इंच की थाली’ या जेवणाच्या दोन थाळ्या सुरु केल्या. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे देशभरातून कौतूक करण्यात आले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी आता आणखी एक अनोखी थाळी खवय्यांसाठी सुरु केली आहे. या थाळीचे नाव आर्टिकल ३७० असे आहे. ऑर्डर २.१ ह्या रेस्टॉरंटमध्ये जम्मू-काश्मीरमधील सरकारी ओळखपत्र दाखवल्यास ‘आर्टिकल ३७०’ थाळीवर ३७० रुपयांची सवलत देण्यात येते.

ह्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी थाळीची किंमत २,३७० रुपये आहे आणि मांसाहारी थाळीची किंमत २,६६९ रुपये आहे. ‘आर्टिकल ३७०’ थाळीच्या शाकाहारी मेनूमध्ये काश्मिरी पुलाव, खमीरी चपाती, नादरू की शमी, दम आलू आणि कहावा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, काश्मिरी पुलाव, यीस्ट ब्रेड, नादरू की शमी, रोगन जोश आणि कहावा यांचा मांसाहारी थाळीमध्ये समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हे रेस्टॉरंट आगळी वेगळी शक्कल लढवत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. “मोदीजी 56 इंचकी थाली” ते “बाहुबली पिक्चर'” असे थाळ्यांचे प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी ऑर्डर २.१ ह्या रेस्टॉरंटने “युनाइटेड इंडिया थाली” नावाची निवडणूक स्पेशल थाळी सादर केली होती, तिचीही चांगलीच चर्चा झाली होती.