मुलाखतीत पहिलं म्हणजे उमेदवाराचा रिझ्युमे विचारला जातो. या रिझ्युमेमध्ये तुमचं शिक्षण, अनुभव, तुमच्यातल्या अनेक गोष्टी थोडक्यात आणि मुद्देसूद पद्धतीनं मांडल्या जातात. तेव्हा हा रिझ्युमे आकर्षक, प्रभावी करण्यात अनेकांचा भर असतो, आपल्या रिझ्युमेमध्ये जास्तीत जास्त मुद्दे मांडले की समोरच्या व्यक्तीवर चांगलीच छाप पडते असे अनेक समज-गैरसमज आपल्या मनात असतात पण, रिझ्युमे कसा असावा याचं उत्तम उदाहरण अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्कनं दिलं आहे. त्यांचा एक पानी रिझ्युमे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. टेस्ला, स्पेस एक्स या कंपनीचे कार्यकारी अधिकारी, जगातील अब्जाधिशांपैकी एक अशी ओळख इलॉन मस्क यांची आहे.

VIRAL VIDEO : धक्कादायक! मुलांचा सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश, चिमुरडीवर सिंहाचा हल्ला

तेव्हा इलॉन यांचा रिझ्युमे अर्थात खूप मोठा असणार असा आपला समज असेल पण एक उत्तम रिझ्युमे कसा असावा हे त्यांनी आपल्या रिझ्युमेमधून दाखवून दिलं आहे. टेस्ला, स्पेस एक्स या कंपनीचे कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे इतरही गोष्टीत मोठा अनुभव असलेल्या इलॉन यांनी आपला रिझ्युमे मात्र थोडका पण प्रभावी ठेवला आहे. आपला अनुभव, आपलं काम, आपल्यातली कला या साऱ्या गोष्टी मोजक्या शब्दांत पण तितक्याच प्रभावीपणे त्यांनी मांडल्या आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एक पानाचा रिझ्युमे हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याआधीही इलॉन यांनी आपला रिझ्युमे समोर आणला होता. त्यावेळीही तो तितकाच प्रभावी ठरला होता. रिझ्युमे तयार करणारी कंपनी नोव्हो रिझ्युमे या कंपनीनं २०१६ मध्ये तो जगासमोर आणला होता.