म्हातारपणात आपण कसे दिसू हे पाहण्याच्या उत्सुकतेनं सध्या सोशल मीडियावर FaceApp या मोबाइल अॅपचा वापर केला जात आहे. या अॅपची क्रेझ इतकी वाढलीये की सोशल मीडियावर ‘FaceApp Challenge’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे. सेलिब्रिटींनाही या अॅपने भुरळ पाडली आहे. फेसुबक, इन्स्टाग्रामवर तरुण मित्र-मैत्रिणींचे, सेलिब्रिटींचे म्हातारपणाचे फोटो पाहताना तुम्हाला नवल वाटत असेल, पण या फोटोंच्या नावाखाली हे अॅप लोकांची खासगी माहिती गोळा करत आहे, असा आरोप होत आहे. तसंच युजरच्या परवानगीशिवाय त्याच्या गॅलरीतून फोटोंची माहिती घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.

‘फेसअॅप’ फोटोत बदल घडविताना आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलजीचा वापर करते. हे एक रशियन अॅप असून 2017 सालीच बाजारात आले होते. मात्र या अॅपवरील नवीन अपडेटमुळे ते चर्चेत आलं आहे. दोन वर्षांपूर्वी या अॅपवर असेच आरोप करण्यात आले होते. रशियाच्या यारोस्लाव गोनचारोव्ह यांनी हे मोबाईल अॅप सुरू केलं आहे. मोबाईल अॅपची ‘privacy policy’ अशी बनवली आहे, की त्यामुळे तिसऱ्या पक्षाला माहिती पुरवण्यात मदत होत आहे, असा आरोप होत आहे.

हे अॅप युजर्सची खाजगी माहिती काढून घेत आहे, असं ट्वीट तंत्रज्ञान विषयक रिपोर्टर स्कॉट बडमॅन यांनी केलं आहे. इतकंच नव्हे अमेरिकेच्या कायदेमंडळाच्या सदस्यांनी या अॅपची चौकशी ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’कडून (FBI) करण्याची मागणी केली आहे.

FaceApp चे स्पष्टीकरण काय आहे?

दरम्यान युजर्सची खासगी माहिती धोक्यात नसल्याचं स्पष्टीकरण फेसअॅपकडून देण्यात आलं आहे. ‘या अॅपमध्ये फोटो प्रोसेसिंग हे क्लाऊडमध्ये होतं. युजरने निवडलेलाच फोटो एडीट करून अॅपद्वारे अपलोड केला जातो. त्याशिवाय दुसरे कोणतेच फोटो फोनमधून क्लाऊडला ट्रान्सफर केले जात नाहीत. बरेचसे फोटो आमच्या सर्व्हरवरून अपलोड केल्याच्या ४८ तासांच्या आत डिलीट केले जातात. त्याचप्रमाणे युजरकडून मागणी झाल्यास आम्ही आमच्या सर्व्हरवरून त्यांचा सगळा डेटा काढून टाकतो,’ असं या अॅपकडून सांगण्यात आलं आहे.

कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना ही काळजी नक्की घ्या-

फोनमध्ये कोणतंही अॅप इन्स्टॉल करताना त्यातल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. अॅपच्या नियम आणि अटी या तुमच्या खासगी माहिती वापरण्याविषयी असतात. त्यामुळे सूचना वाचल्याशिवाय संबंधित अॅपला सगळ्या परवानग्या देऊ नका.