अन्नपदार्थाच्या भेसळीबाबत समाजमाध्यमांवर अनेक माहिती किंवा चित्रफिती प्रसारित होत असतात. मात्र अनेकदा एखाद्या बडय़ा कंपनीच्या उत्पादनाला बदनाम करण्यासाठी त्या उत्पादनात भेसळ असल्याची असत्य आणि निराधार माहितीही समाजमाध्यमांत प्रसारित होत असते. अमूल दूध कंपनीच्या दुधात प्लास्टिकचे घटक असून ते हानीकारक आहे, हे दाखवणारी चित्रफीत सध्या समाजमाध्यमांत प्रसारित करण्यात आली आहे. जवळपास ३ मिनीट ५७ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. यामध्ये दूध गरम केल्यावर प्लास्टिकचे घटक वर येतात, असा दावाही या चित्रफितीत करण्यात आला आहे.

मात्र ही चित्रफीत बनावट असल्याचे समोर आले आहे. ही चित्रफीत बनवणाऱ्यांविरोधात प्रयागराज शहरातील करनालगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुणकुमार त्यागी यांनी सांगितले की, ‘बनावट चित्रफीत बनवण्यात आल्याप्रकरणी या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड संहिता कलम ३८६ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ अन्वये दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीसीएमएमएफच्या अधिकारी वर्गाने हा व्हि़डिओ सोशल मिडियावरून काढून टाकण्याची मागणी केली तेव्हा आोरोपीने १० लाख रुपयांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ’

‘ही चित्रफीत बनावट असून ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी ती बनवण्यात आली आहे. याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुधात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नाही. आमची कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत नाही. बाजारात आणण्यापूर्वी चार वेळा दुधाची चाचणी केली जाते,’ असे या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.