‘जेलसेमियम-२००’ हे होमिओपथिक गोळ्या तीन आठवडय़ांसाठी दिवसांतून तीनदा घेतल्यास ‘निपा’ या प्राणघातक साथीपासून बचाव होऊ शकतो,’ असा प्रसार करणारी ‘पोस्ट’ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाली आहे. या संदेशासोबत ‘जेलसेमियम-२००’ च्या गोळ्यांचे एक छायाचित्रही ‘पोस्ट’ करण्यात आले आहे. मात्र समाजमाध्यमांवर प्रसारित झालेला हा संदेश खोटा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जारी करण्यात प्रसिद्धीपत्रकात ‘निपा’ला नियंत्रणात आणणारी कोणतीही लस वा गोळ्या अद्याप तयार झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केरळमध्ये ‘निपा’ साथ उद्भवल्यानंतर त्याविषयीच्या गोळ्या आणि औषधांविषयीच्या अनेक बनावट ‘पोस्ट’ फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित झाल्या आहेत. जागतिक तसेच देशस्तरावरील विविध तज्ज्ञांनी याविषयी मते मांडूनही समाजमाध्यमांवर पसरविण्यात येत असलेली माहिती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरोग्य संघटनांकडून करण्यात आले आहे.